नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा | पुढारी

नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

बंद पडलेले क्रेडिट कार्ड चालू करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी भामट्याने चांदवड शहरातील फुलेनगर येथील माजी सैनिकाला तब्बल ९९ हजार ३२३ रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फुलेनगर येथील सेवानिवृत्त सैनिक बबन सोनवणे (५७) यांना मंगळवारी (दि. ३१) दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने तुमचे क्रेडिट कार्ड बंद पडले आहे. ते पुन्हा चालू करावयाचे असल्याने तुम्हाला एक लिंक पाठवतो. तिच्यामधील माहिती व ओटीपी भरून पाठवा. त्यानंतर सोनवणे यांनी सदर लिंक ओपन करून माहिती व ओटीपी पाठवला. काही वेळात सोनवणे यांच्या क्रेडिट कार्डच्या खात्यातून ७ वेळा १४ हजार १८९ रुपये याप्रमाणे ९९ हजार ३२३ रुपये काढले गेले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सोनवणे यांनी पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना घडलेला सर्व प्रकार कथन केला. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपली किंवा बँकेशी निगडित कोणतीही माहिती देऊ नये. आज ऑनलाइन व्यवहारामुळे प्रत्येक व्यक्तीचा मोबाइल नंबर व आधारकार्ड हे बँक खात्याशी जोडले गेले आहे. यामुळे आर्थिक फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी फसव्या लिंक व ओटीपी शेअर करू नये. – समीर बारवकर, पोलिस निरीक्षक, चांदवड.

हेही वाचा:

Back to top button