Budget 2023 Share Market | बजेटवर शेअर बाजाराने कसा दिला प्रतिसाद?; वाचा आज काय घडलं? | पुढारी

Budget 2023 Share Market | बजेटवर शेअर बाजाराने कसा दिला प्रतिसाद?; वाचा आज काय घडलं?

Budget 2023 Share Market : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या. आयकरात दिलेली सूट, उत्पादनाला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आणि आजच्या व्यवहारात सेन्सेक्स १,१०० अंकांपर्यंत वाढला. आज सकाळपासूनच भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. पण बाजार बंद होताना ही तेजी ओसरली आणि दोन्ही निर्देशांकांनी काही वेळ स्थिर पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स १५८ अंकांच्या वाढीसह ५९,७०८ वर बंद झाला. तर निफ्टी ४५ अंकांनी घसरून १७,६१६ वर स्थिरावला.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला होता. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर सेन्सेक्सने १,१७१ हजार अंकांनी उसळी घेतली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स १,१७१ हजार अंकांच्या वाढीसह ६०,७२१ वर गेला. तर निफ्टी २९४ अंकांच्या वाढीसह १७,९५६ वर पोहोचला. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना २.२४ लाख कोटींनी श्रीमंत झाले. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २७२.४७ लाख कोटींवर पोहोचले आहे.

नवीन कर प्रणालीमध्ये वैयक्तिक आयकरात ५ स्लॅब तयार करण्यात आले आहेत. आयकर सूट मर्यादा आता ७ लाखापर्यंत केली आहे. तर ३ लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. (Budget 2023 Personal income-tax)

५ स्लॅबमध्ये ३ लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. तसेच ३ ते ६ लाखांपर्यंत ५ टक्के, ६ ते ९ लाखांपर्यंत १० टक्के, ९ ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाखांपर्यंत २० टक्के आणि १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर असेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पातील घोषणानंतर शेअर बाजारात तेजी आली. बँकिंग, फायनान्सियल, रिअल्टी आणि ऑटो या क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक वधारले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार केला. आयसीआयसीआय निफ्टीवरील टॉप गेनर ठरला. हा शेअर सुमारे ४ टक्क्यांने वाढले. यामुळे निफ्टीही १.६ टक्क्यांने ‍वाढून १८ हजारांजवळ पोहोचला.

इन्शुरन्स स्टॉक्सवर दबाव

अर्थसंकल्पात सिगारेटवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (NCCD) १६ टक्क्यांने वाढवल्याची घोषणा झाल्यानंतर ITC चे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरले. ही घसरण खूप अधिक आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर इन्शुरन्स स्टॉक्सवर दबाव दिसून आला. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, HDFC लाइफ इन्शुरन्स, Life Insurance Corporation of India या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

हे आहेत टॉप गेनर्स

एनएसईवर आजच्या व्यवहारात आयसीआयसीआय, टाटा स्टील, एचडीएफसी, जेएसडब्ल्यू स्टील हे टॉप गेनर्स राहिले. तर एचडीएफसी लाइफ, अदानी पोर्ट्स, सन फार्मा हे शेअर्संनी लाल रंगात व्यवहार केला. एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक आणि टेक महिंद्रा हे देखील शेअर्स तेजीत आहेत. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी रिअल्टी १.३६ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.१५ टक्के वाढला. बँक, ऑटो, मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि आयटी शेअर्स वाढले.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत वाढ, सिमेंट कंपन्यांचे शेअर्स वधारले

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी ६६ टक्के वाढवून ६६,००० कोटी रुपये करण्याची घोषणा केली. ही घोषणा सिमेंट कंपन्यांसाठी सकारात्मक असल्याने सिमेंट कंपन्यांचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले. इंडिया सिमेंट्सचा शेअर सर्वाधिक ३.७८ टक्क्यांने वाढला. रॅमको सिमेंट्स २.३८ टक्क्याने, श्री सिमेंट्स २.७० टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट्सचा शेअर १.०४ टक्के वाढला.

अदानींच्या शेअर्समध्ये घसरण कायम

अर्थसंकल्पातील घोषणांचा अदानींच्या शेअर्संना काहीच फायदा झाला नाही. अदानींच्या शेअर्स बुधवारीदेखील घसरण कायम राहिली. अदानींच्या शेअर्सवर हिंडेनबर्ग इफेक्ट अजूनही आहे. आजच्या व्यवहार अदानी पोर्ट्सचा शेअर १५ टक्के घसरला. अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अंबुजा सिमेंट हे १० टक्क्यांपर्यत घसरले. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून आतापर्यंत ४३ टक्क्यांनी खाली आला आहे. अदानी पॉवर, अदानी विल्मर, एनडीटीव्ही हे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. (Budget 2023 Share Market)

दरम्यान, अधिकृत आकडेवारीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०२३ मध्ये आतापर्यंत २८८.५२ अब्ज रुपयांच्या (३.५३ अब्ज डॉलर) किमतीचे शेअर्स विकले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button