नाशिक शहरातील खासगी सावकारांच्या घरांवर छापेमारी | पुढारी

नाशिक शहरातील खासगी सावकारांच्या घरांवर छापेमारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सावकारांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने उपनिबंधक कार्यालयाकडून शहरातील काही खासगी सावकारांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यात पथकांनी सावकारांच्या घरातून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे व इतर पुरावे जप्त केल्याचे समोर येत आहे. कर्जदारांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई केल्याचे उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. शहरातील सातपूर, सिडकोसह इतर भागांमधील सावकारांच्या घरांवर ही कारवाई झाली आहे.

सातपूर येथे सावकारांच्या जाचाला कंटाळून पित्यासह दोन मुलांनी आपले जीवन संपविले. त्याचप्रमाणे पाथर्डी फाटा येथेही जगताप दाम्पत्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून, तर इतरांनीही सावकारांमुळे आपले जीवन संपविल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे खासगी सावकारांच्या जाचाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तक्रार आल्याशिवाय उपनिबंधक किंवा पोलिस यंत्रणा कारवाई करत नसल्याने सावकारांचे फावले आहे. सावकारांनी स्थावर मालमत्तेवर मालकी हक्क सांगितल्यास कर्जदार उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करू शकतो. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाकडे काही कर्जदार, तक्रारदारांनी शहरातील सावकारांविरोधात तक्रार केल्याने संबंधित सावकारांच्या घरी पथकांनी कारवाई करीत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील योगेश गांगुर्डे, सिडकोतील शालिनी पवार व राजेश पवार यांच्या घरी पथकांनी कारवाई करीत काही कागदपत्रे व इतर पुरावे गोळा केल्याचे समजते. या कारवाईदरम्यान, पथकांनी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तही घेतला होता.

हेही वाचा :

Back to top button