नगर : बोगस डॉक्टर गजाआड; परवानाधारक डॉक्टरांचा बोर्ड लावून रुग्णावर उपचार | पुढारी

नगर : बोगस डॉक्टर गजाआड; परवानाधारक डॉक्टरांचा बोर्ड लावून रुग्णावर उपचार

नगर; पुढारी वृत्तसेवा : परवानाधारक डॉक्टरांचा बोर्ड लावून रुग्णावर उपचार करणार्‍या बोगस डॉक्टराचे पितळ आरोग्य विभागाने उघडे केेले. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. ज्ञानदेव पवार (रा. साकत) असे अटकेतील बोगस डॉक्टराचे नाव आहे. तो बोस नावाच्या डॉक्टरांचा बोर्ड लावून रुग्णावर उपचार करत होता. गावकर्‍यांनी याबाबतची तक्रार तालुका आरोग्य विभागाकडे केली. तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी पोलिस पथकाच्या मदतीने छापा टाकत कागदपत्रांची तपासणी केली. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पवार हा रुग्णावर उपचार करत असल्याचे निदर्शनास आले.

डॉ. मांडगे यांनी उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे जबाब घेतले. त्यात डॉ. बोस नव्हे तर पवार हाच उपचार करत असल्याचे निदर्शनास आले. रुईछत्तिशी गावातील एका महिलेचा दवाखान्यात डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू व डॉक्टरांचे उपचार याबाबत डॉ. मांडगे यांनी कागदपत्रे तपासली, मात्र तसे काही आढळले नाही. नातेवाईकांचीही काही तक्रार नाही, मात्र तक्रार आली तर योग्य ती कारवाई केली जाईल, असे डॉ. मांडगे यांनी सांगितले.

कारवाई दरम्यान दवाखान्यात असणार्‍या औषधांची जप्ती करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून पवार हा बोगस डॉक्टर उपचार करत असल्याचे सांगण्यात आले. दवाखाना सील करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लहू चव्हाण, वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी बोगस डॉक्टराचा पर्दाफाश केला.

तालुकास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करून कोणत्या हॉस्पिटलला कोणते औषधे देण्याचा आणि कोणत्या डॉक्टरांना कोणते उपचार करण्याचा परवाना आहे याची सखोल चौकशी केली जाईल.
                                                             – डॉ. ज्योती मांडगे,
                                                            तालुका आरोग्य अधिकारी

Back to top button