पुणे : हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राचा 135 कोटी निधी | पुढारी

पुणे : हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राचा 135 कोटी निधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिका शहरात विविध उपाययोजना करणार आहे. यासाठी केंद्राने 135 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपाययोजना केल्यानंतर पुन्हा प्रोत्साहन निधी (इन्सेंटिव्ह) दिला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.  विकास प्रकल्पांमुळे हवेतील धूलिकणांमध्ये होणारी वाढ, वाढते शहरीकरण, वाहनांचा धूर आणि औद्योगिक विस्तारामुळे वाढलेले हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ’नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ जाहीर केला आहे.

पहिल्या टप्प्यात देशातील सर्वाधिक प्रदूषण करणार्‍या 106 शहरांची निवड करण्यात आली असून, यात पुण्यासह राज्यातील सतरा शहरांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत राज्यातील 17 शहरांच्या अधिकार्‍यांची केंद्रीय अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका कोणकोणत्या उपाययोजना करणार आहे, याचे सादरीकरण केले. नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत सूक्ष्म धुलिकणांचे (पार्टिक्युलेट मॅटर 10) आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पीएम 2.5 मायक्रॉन व्यासाचा घातक सूक्ष्मकण) प्रमाण 2024 पर्यंत 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

त्यानुसार पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी महापालिकेला 135 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून शहरातील धुलिकणांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी चौकांमध्ये कारंजी उभारणे, स्मशान भूमींमध्ये विद्युतदाहिन्या, गॅसदाहिन्यांची संख्या वाढविणे, शहरातील विद्युत वाहनांची संख्या वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, रस्तेसफाईच्या कामात सुधारणा, सार्वजनिक वाहतुकीच्या अधिकाधिक वापरास प्रोत्साहन, मेट्रोसाठी फीडर सेवा म्हणून 300 मिडी बसची खरेदी आदी उपाययोजनाही केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या तीन वर्षांसाठी 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Back to top button