नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत येथे नाशिक जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषदेत मतदान सुरू असताना दुपारी तीनच्या दरम्यान राज्यशास्त्र विषयाच्या दिव्यांग (अंध) मतदार प्रा. सम्राज्ञी सुनील राहाणे या मतदानासाठी आल्या असताना त्यांना मतदान केंद्रअधिकारी यांनी मतदानापासून रोखले.

नाशिक येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या प्रा. सम्राज्ञी सुनील राहाणे यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघामध्ये रीतसरपणे नावनोंदणी केलेली होती. त्यानुसार मतदार यादीत त्यांचे नाव देखील आले. त्यानुसार सोमवार, दि. 30 रोजी आज प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी त्यांनी ओळखपत्र घेऊन मतदान कक्षामध्ये प्रवेश केला. अंध असल्यामुळे त्यांचे पिताश्री डॉक्टर सुनील राहाणे यांनी दिव्यांग कन्येच्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठीची समर्थता दर्शवली. परंतु मतदान केंद्र अधिकारी यांनी त्यांना मज्जाव केला. आणि एका उचविद्या विभूषित आणि राज्यशास्त्र विषयाचे पदवी प्राप्त केलेल्या पदवीधर दिव्यांग प्राध्यापिकेला मतदानापासून वंचित राहावे लागले. खरे तर लोकशाहीमध्ये एखाद्या मतदारास मतदानाचा अधिकार नाकारणे हा खरं तर गुन्हा होऊ शकतो. या संदर्भात निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्याशी संपर्क करून चौकशी केली असता पदवीधर मतदारसंघांमध्ये ज्याने त्याने त्याच्या मतदानाचा अधिकार बजावयचा असतो. अशी नियमांची पुष्ठी त्यांनी पुढे केली. यामध्ये सत्यता असली तरी एका पदवीधराला मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागले. हे लोकशाही मतदान प्रक्रियेतील उणीव मानायची का ? कमतरता मानायची का ? अशा अंध अपंग पदवीधर मतदारांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता कामा नये. दिव्यांगाचे प्रमाणपत्र पाहून त्यांना मतदान करण्यास संधी दिली जाते. इतर निवडणूक मतदान प्रक्रियेत त्यांना मतदानापासून वंचीत ठेवले जात नाही. मग पदवीधर मतदार संघाचे नियम वेगळे का?अशीच चर्चा पदवीधर मतदारांमध्ये चर्चा सुरू होती.

हेही वाचा:

Back to top button