नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच | पुढारी

नाशिक : अंबडमधील अवैध धंद्यांच्या आमदार राणे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबडमधील अवैध धंद्यांमागील अर्थकारणात तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी केल्याप्रकरणी अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे हे अंबडमध्ये घडलेल्या गुन्ह्यांसह तेथील कारवाईची तुलनात्मक माहिती गोळा करत आहेत. काही अवैध धंद्यांवरील कारवाईमध्ये एकाच ठिकाणच्या किंवा एका व्यक्तीवर वारंवार कारवाई होत असल्याचे चौकशीतून समोर येत असून, त्याचाही तपास सुरू आहे. आरोपांची शहानिशा करण्यासाठी जबाब घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे ठोस पुरावे किंवा माहिती संकलित करण्यावरही भर दिला जात आहे.

हिवाळी अधिवेशनात अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या आर्थिक मुद्यांवरून आ. राणे यांनी लक्षवेधी मांडली. त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक देशमुखांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक साळुंखे नाशिकमध्ये मुक्कामी असून, आरोपांची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रत्येक व्यक्ती, घटनांची चौकशी करत आहेत. त्यादृष्टीने पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचे जाबजबाब घेतले असून, पोलिसांविरोधात कोणी तक्रार दिल्यास त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचेही जबाब घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे देशमुख यांच्या कार्यकाळात व त्या आधी झालेल्या गुन्ह्यांची व कारवाईची तुलना केली जात आहे. एकाच ठिकाणी किंवा विशिष्ट व्यक्तींवरच वारंवार कारवाई होत असल्याने या कारवाईचा हेतू काय होता, याचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी देशमुख यांच्याविरोधात आलेले तक्रार अर्ज, निवेदन देणार्‍यांचेही जबाब घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल शासनाकडे सादर होणार असून, त्यानंतर देशमुख यांची खातेअंतर्गत चौकशी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

नागरेंवरही कारवाई?
आ. राणे यांनी देशमुख यांच्यासह तत्कालीन पोलिस कर्मचारी प्रशांत नागरे यांच्यावरही आरोप केला होता. दहा वर्षे एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत राहून अवैध धंद्यांत सहभाग घेतल्याचा आरोप नागरेंवर आहे. त्यामुळे त्यांची तातडीने पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली. मात्र, नागरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत पोलिस दलात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button