नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड | पुढारी

नाशिक : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरगुती वापराच्या गॅसचा काळाबाजार करून ताे अवैधरीत्या खासगी रिक्षा व अन्य वाहनांमध्ये भरणाऱ्या दाेघांना गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने सातपूर परिसरात पकडले.

महेश रमेश गांगुर्डे (रा. कुणाल रो हाउस, हेडगेवार चौक, सिडको) आणि नीलेश दिनेश इंगळे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) अशी या दोन संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथक अवैध धंद्यांचा शाेध घेत असतात. युनिट दाेनचे हवालदार राजेंद्र घुमरे यांना केवल पार्क येथे अवैध गॅस भरणा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पथकातील पाेलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक पोपट कारवाळ, सहायक उपनिरीक्षक यशवंत कोळी, हवालदार घुमरे, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, संपत सानप, संजय सानप, अतुल पाटील, सुनील आहेर, प्रशांत वालझाडे व पुरवठा निरीक्षक स्वप्निल थोरात यांनी केवल पार्कमधील सचिन काळे यांच्या पत्र्याच्या शेडसमोरील अड्ड्यावर छापा टाकला. यात गॅस सिलिडरमधून खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे दाेन रिफिलिंग मशीन, भरलेल्या व रिकाम्या अशी २१ गॅस सिलिंडर, दाेन वजनकाटे, नीलेश इंगळेकडे 1200 रुपयांची रोकड असा ९१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सातपूर पाेलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button