Amrit Udyan : राष्ट्रपती मुर्मु यांनी केले उद्यान उत्सवाचे उद्घाटन; मंगळवारपासून अमृत उद्यान जनतेसाठी खुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नामकरण अलीकडेच ‘अमृत उद्यान’ असे करण्यात आले होते. या अमृत उद्यानातील ‘उद्यान उत्सवा’ चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. येत्या 31 जानेवारीपासून हे उद्यान काही काळाकरिता जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे.(Amrit Udyan)
वर्षातून एकदा हे उद्यान जनतेकरिता खुले केले जाते. यंदा 31 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत जनतेला उद्यान पाहता येईल. शंभर वर्षापेक्षा जास्त काळ मुघल गार्डन या नावाने राष्ट्रपती भवनातले उद्यान ओळखले जात होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत गेल्या शनिवारी त्याचे नाव ‘अमृत उद्यान’ असे करण्यात आले होते. 28 ते 31 मार्च या कालावधीत विशेष श्रेणीतील लोकांसाठी हे उद्यान खुले राहील. शेतकऱ्यांसाठी 28 मार्च, दिव्यांग लोकांसाठी 29 मार्च, लष्कर-निमलष्करी दलातील सैनिक व पोलिसांसाठी 30 मार्च तर महिला, आदिवासी स्वयंसहाय्यता समूहासाठी 31 मार्च रोजी हे उद्यान खुले राहणार असल्याचे राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रपती भवनातील ईस्ट लॉन, सेंट्रल लॉन, लॉंग गार्डन व सर्क्युलर गार्डन हे मूळ अमृत गार्डनचे स्वरूप होते. तत्कालीन राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळात या उद्यानाचा विस्तार करण्यात आला होता. वरील दोन राष्ट्रपतींच्या काळात हर्बल – 1, हर्बल – 2, ट्रकटाईल गार्डन, बोन्साय गार्डन, आरोग्य वनम यांचा समावेश या उद्यानात झाला होता. अमृत उद्यानात यावेळी 12 विशेष स्वरूपाची ट्यूलीप फुलांची झाडे लोकांना पाहता येतील.
हेही वाचा
- नाशिक पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा
- Shelke Complex | कोल्हापूर : बांबवडेत ‘शेळके’ कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या बिल्डरांमध्ये वादाची ठिणगी; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ