नाशिक : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून करून घ्या 1,209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार | पुढारी

नाशिक : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून करून घ्या 1,209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढल्यास विविध 1,209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करता येणार आहेत. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपये प्रतिवर्ष प्रतिकुटुंब वैद्यकीय संरक्षण मिळणार आहे. दरम्यान, कार्ड तयार करण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून शिबिर घेण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील पात्र लाभार्थींना गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी यापूर्वीही नाशिक महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. मात्र, अद्याप अनेक पात्र लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढलेले नाही. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर मनपांतर्गत सर्व रुग्णालयांमध्ये यादी उपलब्ध आहे. यादीमधील पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड या कागदपत्रांसह महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत सर्व खासगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालय व महानगरपालिकांच्या रुग्णालयांत गोल्डन कार्ड तयार करून घेता येणार आहे. मनपातर्फे पात्र लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

विभागनिहाय शिबिर असे…
नाशिक पूर्व विभागात डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 2 ते 11 फेब्रुवारीदरम्यान, सकाळी 10 ते 4 या वेळेत डॉ. गणेश गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होईल. तसेच वडाळा गाव येथील श. प्रा. आ. केंद्र येथे याचदिवशी शिबिर होईल.

पश्चिम विभागात बारा बंगला येथील श. प्रा. आ. केंद्र सिव्हिल येथे डॉ. चारूदत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 8 फेब्रुवारीदरम्यान शिबिर होईल.

नाशिकरोडला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ते 11 फेब्रुवारीदरम्यान शिबिर होईल.

सातपूरला श. प्रा. आ .केंद्र मायको दवाखाना येथे डॉ. योगेश कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 ते फेब्रुवारीदरम्यान शिबिर होईल.

पंचवटीत श.प्रा.आ.केंद्र मायको दवाखाना येथे डॉ. विजय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ते 10 फेब्रुवारीदरम्यान शिबिर होईल.

याशिवाय सिडकोत श. प्रा. आ. केंद्र सिडको येथे डॉ. विनोद पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ते 11 फेब्रुवारीदरम्यान शिबिर होईल.

हेही वाचा:

Back to top button