बेळगाव : ‘पुढारी’तर्फे आज सहकार महापरिषद | पुढारी

बेळगाव : ‘पुढारी’तर्फे आज सहकार महापरिषद

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  ‘विनासहकार नाही उद्धार’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या सहकाऱ क्षेत्राला गेल्या दहा वर्षांत अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यातच कोरोना संकटामुळे संस्थांची प्रगती काहीशी मंदावली आहे. अशा स्थितीत पतसंस्थांनी उत्पन्नवाढीचे कोणते नवे मार्ग शोधावेत, नव्याने येऊ घातलेल्या कायद्याची भीती न बाळगता कारभार कसा करावा अशा विविध विषयांवर पतसंस्था चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘पुढारी’ समूहाने सहकार महापरिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत सहकार क्षेत्रातील दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत.

बेळगाव-गोवा रोडवरील हॉटेल रिजेंटा रिसार्टमध्ये रविवारी 29 जानेवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ही महापरिषद होईल. महापरिषदेचे डिजिटल प्रायोजक गो कॅशलेस इंडिया प्रा. लि. (तत्काळ बँकिंग) असून, विशेष सहकार्य (पॉवर्ड बाय) लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे आहे, तर श्री महालक्ष्मी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. तोपिनकट्टी हे सहप्रायोजक आहेत.
सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार महापरिषदेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन होणार आहे. लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, गो कॅशलेस इंडिया प्रा. लि. चे संचालक डॉ. कृष्णात चन्ने, श्री महालक्ष्मी को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, वक्ते डी. ए. चौगुले, संदीप पाटील, प्रशांत भालेराव यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी मान्यवरांचा सत्कार होईल. पहिल्या सत्रात सकाळी 11.15 वाजता सहकार विभागाचे माजी सहसंचालक डी. ए. चौगुले (कोल्हापूर) यांचे ‘सहकारी संस्था ः उत्पन्नवाढ, ऑडिट आणि कायदा’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी 12.15 वाजता गो कॅशलेस इंडिया प्रा. लि. चे संचालक डॉ. कृष्णात चन्ने (पुणे) यांचे ‘सहकाराचे डिजिटलायजेशन आणि संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दुसर्‍या सत्रात दुपारी 2.20 वाजता संदीप पाटील (लोणावळा) यांचे ‘सहकारी संस्थांचे उत्कृष्ट व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन होईल.
दुपारी 3.20 वाजता ‘सहकारी संस्था आणि मल्टिस्टेट सोसायटी यांची आधुनिकतेकडे वाटचाल’ या विषयावर रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रशांत भालेराव (अहमदनगर) यांचे व्याख्यान होईल. देशातील नऊ राज्यांत 110 शाखा व 10 लाख खातेदार असलेल्या रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटीचे भालेराव हे प्रवर्तक आहेत.

Back to top button