नाशिक : काळ्या बाजारातील दहा लाखांचे रेशनधान्य जप्त; व्यापार्‍यास अटक | पुढारी

नाशिक : काळ्या बाजारातील दहा लाखांचे रेशनधान्य जप्त; व्यापार्‍यास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्री करणार्‍यास ग्रामीण पोलिसांनी पकडले. वडनेर भैरव येथे पोलिसांनी ही कारवाई करीत संशयिताकडून सुमारे 10 लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला. अमोल शिरसाठ (33, रा. वडनेर भैरव, ता. चांदवड) याच्याविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वडनेर भैरव येथे गस्त घालत असताना खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित शिरसाठ हा रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करत असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी शिरसाठला ताब्यात घेत वडनेर भैरव शिवारातील गोदामावर छापा टाकला. या गोदामात पोलिसांना 50 किलो वजनाच्या तुकडे चुरा तांदळाच्या 655 गोण्या, 50 किलो वजनाच्या तांदळाच्या 27 गोण्या आढळल्या. या गोण्यांवर ‘भारत सरकार के सौजन्य से’ असे लिहिलेले होते. या धान्याची किंमत 10 लाखांहून अधिक आहे. त्यामुळे संशयिताने काळ्या बाजारात शासकीय धान्याची विक्री व वाहतूक करण्याच्या इराद्याने व आर्थिक फायदा मिळविण्यासाठी धान्याचा काळा बाजार केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी धान्यांसह एमएच 15 एजी 0087 क्रमांकाचे वाहन असा एकूण 14 लाख 79 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वडनेर भैरव पोलिस ठाण्यात शिरसाठ विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, हवालदार उदय पाठक, पोलिस नाईक नवनाथ वाघमोडे, सागर काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा:

 

Back to top button