नगर : साकूर परिसर पुन्हा वेठबिगारीच्या चक्रव्यूहात ; दोन मेंढपाळांकडे आढळली इगतपुरीतील आदिवासी समाजाची 3 अल्पवयीन मुले | पुढारी

नगर : साकूर परिसर पुन्हा वेठबिगारीच्या चक्रव्यूहात ; दोन मेंढपाळांकडे आढळली इगतपुरीतील आदिवासी समाजाची 3 अल्पवयीन मुले

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर परिसरात 2 मेंढपाळ व्यावसायिकांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून कातकरी समाजातील पालकांचे अज्ञान व गरिबीचा गैरफायदा घेत 3 अल्पवयीन मुले शेळ्या, मेंढ्या सांभाळण्यास आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले. शारीरिक पिळवणूक व मानसिक छळ करून बालकांना जबरदस्तीने मेंढ्या सांभाळण्याचे काम करावयास लावले. हा माणुसकीला काळीमा फासणारा खळबळजनक प्रकार शुक्रवार (दि. 27 )जानेवारी रोजी समोर आल्याने साकुर परीसरात पुन्हा एकदा मानव तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाल कामगारांचा गैरवापर केला जात असल्याचा घृणास्पद प्रकार पुन्हा समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.

साकुर येथे पठार भागात बहुतांश कुटुंबिय मेंढपाळ व्यवसाय करतात. या व्यावसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने गावोगावी भटकंती करून मेंढ्या चारण्यास मेंढपाळ व्यावसायिक मेंढ्यांची कळपे घेऊन गावोगाव भटकंती करतात. हे व्यावसायिक जेथे जातील तेथे कुटुंबियांसह मुक्काम ठोकतात. काही अज्ञानी मेंढपाळ व्यावसायिक असे आहेत की, स्वतःची मुले शिक्षणास पाठवून मेंढ्या चारण्यास वेठबिगार म्हणून अल्पवयीन मुले घेऊन येतात. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून कातकरी समाजातील काही नागरीकांचे अज्ञान व गरिबीचा फायदा घेत अल्पशः आर्थिक देवाणघेवाणीवर 3 अल्पवयीन मुलांना वेठबिगारीसाठी आणून त्यांची शारीरिक पिळवणूक व मानसिक छळ करून मेंढ्या सांभाळण्याचे काम जबरदस्तीने करून घेत असल्याचा प्रकार साकुर पठार भागात पुन्हा घडल्याचे वास्तव समोर आल्याने प्रामाणिक मेंढपाळ व्यवसायिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे बालकामगारांचा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात साकुर पठार भागात इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथून एका एजंटच्या माध्यमातून कातकरी समाजातील एका 10 वर्षीय मुलीला अवघ्या 3 हजार रुपयांत शिंदोडी गावातील विकास सीताराम कुदनर याने वेठबिगारीस आणले होते. तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पती- पत्नी विरूद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, यावेळी इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजातील 6 ते 7 मुले गायब असल्याची खळबळजनक बाब समोर आली होती. यातील 2 मुले व 1 मुलगी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साकुर पठार भागात 15 सप्टेंबर 2022 पासून 27 जानेवारी 2023 दरम्यान मेंढपाळ व्यावसायिक तुकाराम भाऊसाहेब खेमनर (रा. साकुर, ता. संगमनेर) कडे कातकरी समाजातील 2 अल्पवयीन मुले होती. सुदाम वसंत वाघ (वय 7 वर्षे, रा. उभाडे, ता. इगतपुरी, जि. नाशिक व रवी काळू वाघ (वय 11 वर्षे, रा. कांचनगाव, ता. घोटी, इगतपूरी, नाशिक) तर मेंढपाळ शिवा ठोंबरे (पुर्ण नाव माहित नाही) कडे कातकरी समाजातील अल्पवयीन मुलगी जानकी वसंत वाघ (वय 8 वर्षे, रा. उभाडे, ता. इगतपूरी) या इगतपुरी तालुक्यातील 3 अल्पवयीन मुलांना साकुर येथील 2 मेंढपाळांनी आणले होते. ही मुले अनुसूचित जाती- जमातीची असल्याचे माहित असुनही अज्ञान व गरिबीचा फायदा घेत या मुलांना वेठबिगारीचे काम करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून शेळ्या, मेंढ्या सांभाळण्याचे काम जबरदस्तीने करून घेत शारीरिक पिळवणूक व मानसिक छळवणूक केली. याप्रकरणी कातकरी समाजाचे गोकुळ हीलम (रा. कावनई, ता. इगतपूरी) यांच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव करीत आहे.

साकूरच्या वेशीवर अडकली वेठबिगारी..!
एकीकडे संपूर्ण देश 75 वा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या तर दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील आदिवासी समाजातील आदिम कातकरी समाजातील कुटुंब वेठबिगारीच्या चक्रव्यूहात साकुरच्या वेशीवर अडकले आहे.

 

Back to top button