रोजगारनिर्मितीसाठी सकारात्मकता न बाळगल्यास बँकांवर गुन्हे : उदय सामंत | पुढारी

रोजगारनिर्मितीसाठी सकारात्मकता न बाळगल्यास बँकांवर गुन्हे : उदय सामंत

उजळाईवाडी; पुढारी वृत्तसेवा :  कर्जाला शंभर टक्के केंद्र व राज्याची हमी असताना तुम्ही कर्ज प्रकरणे नामंजूर कशी करू शकता? युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी बँकांनी सकारात्मकता बाळगणे गरजेचे आहे. कर्ज प्रकरणे वाढवा. याचा आढावा मी 19 फेब—ुवारीला घेणार आहे; अन्यथा तुमच्याविरोधात एफआयआर दाखल करायला लावू, असा सज्जड दम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बँक अधिकार्‍यांना दिला.

उद्योगमंत्री सामंत शनिवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले असता विमानतळनजीकच्या डी. वाय. पाटील यांच्या फार्महाऊसवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोजगारनिर्मितीसाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातून कर्जासाठी आलेल्या अर्जांची संख्या व एकूण मंजूर झालेल्या अर्जांची संख्या याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांच्याकडून जाणून घेतली.

जिल्हा अग्रणी बँकेचे सतीश गोडसे तसेच अन्य शासकीय बँकांचे अधिकारी यांच्याकडून प्रत्येक बँकेचा आढावा घेतला असता एकूण आलेले अर्ज व मंजूर झालेले कर्जाचे अर्ज यात फारच तफावत आढळून आल्याने उद्योगमंत्री सामंत भडकले. आलेल्या अर्जार्ंपैकी दोनतृतीयांश कर्ज प्रकरणे जर नामंजूर होत असतील, तर ही बाब गंभीर आहे. आम्हाला महाराष्ट्रात रोजगार वाढवायचा आहे. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी सकारात्मकता बाळगा. जिल्हा बँकेतून रोजगारनिर्मितीसाठी कर्ज प्रकरणे जर जादा होत असतील, तर शासकीय बँकांतून का होऊ नयेत. शासकीय बँकांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे; अन्यथा त्यातीलच युवकांना तुमच्याविरोधात एफआयआर दाखल करायला लावू, असा दम मंत्री सामंत यांनी दिला.

‘कोल्हापूर पॅटर्न’ महाराष्ट्रात राबवू

कर्ज मंजूर करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमा. यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य घ्या. समितीकडे कर्ज प्रकरणे मंजूर करण्याची जबाबदारी असेल. जर कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही, तर ते का झाले नाही, हे त्या कर्जदाराला समिती सांगू शकेल. त्यामुळे बँकेने मंजूर-नामंजूर करण्याचा अधिकार राहणार नाही. हा पॅटर्न आपण महाराष्ट्रात राबवू, असेही उदय सामंत म्हणाले.

Back to top button