कोल्हापूर : उड्डाणपुलांसाठी हवेत ६०० कोटी; शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नऊ पूल प्रस्तावित | पुढारी

कोल्हापूर : उड्डाणपुलांसाठी हवेत ६०० कोटी; शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नऊ पूल प्रस्तावित

कोल्हापूर : सतीश सरीकर गेल्या पन्नास वर्षांत कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. आता तर जिल्हा मार्ग, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग हे सुद्धा कोल्हापूर शहरातून आणि परिसरातूनच जातात. जिल्ह्यात १६ लाखांवर वाहनांची संख्या असून कोल्हापूर शहरात सुमारे ८ लाखांवर वाहने आहेत. श्री अंबाबाई दर्शनासाठी भाविक, पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परिणामी, वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शहरात उड्डाण पुलांची आवश्यकता आहे. महापालिकेने नऊ पुलांचा आराखडा तयार केला असून त्यासाठी ६०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक- कोंडा ओळ १५० कोटी 

कोल्हापूर शहरातील एस. टी. स्टँड परिसरातील दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक आणि कोंडाओळ हे वाहतुकीच्या दृष्टीने हॉट स्पॉट आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात एस. टी., केएमटी बसेस धावतात. लक्झरी बसेसही दिवस-रात्र असतात. त्याबरोबरच चारचाकी, दुचाकी, रिक्षासह इतरही वाहतूक असते. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. परिणामी, महापालिकेने तब्बल १८०० मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आवश्यक आहेत.

मार्केट यार्ड ते कावळा नाका – १२५ कोटी 

मार्केट यार्ड ते कावळा नाका या रस्त्यावर अवजड वाहतूक असते. कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची शेती उत्पन्न बाजार समिती असल्याने राज्यासह परराज्यांतून ट्रक येत असतात. जुना पुणे-बंगळूर हायवे असल्याने एस. टी.ची वाहतूकही असते. कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्ग असल्याने भाविक, पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी असते. या रस्त्यावर उड्डाण पुलासाठी महापालिकेने १२५० मीटर लांबीचा आराखडा तयार केला आहे. १२५ कोटींचा हा आराखडा आहे.

सीपीआर ते ट्राफिक ब्रँच ५६ कोटी 

कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती सरकारी दवाखाना म्हणजेच सीपीआर हॉस्पिटल हे चिमासाहेब चौकात आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकातून या ठिकाणी रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. त्याबरोबर शहरातील प्रमुख मार्ग असल्याने स्थानिक नागरिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. श्री अंबाबाई मंदिराकडे दर्शनासाठी जाण्यासाठी भाविक, पर्यटकांना या रस्त्यावरूनच ये-जा करावी लागते. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी अनुभवावी लागते. महापालिकेने सुमारे ६०० मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी ५६ कोटींची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनांची संख्या 

16,18,782
एकूण वा 12,75,659 दुचाकी वाहने
1,54,965 मोटार कार
21,267 जीप – ओम्नी बस
19,043 अॅटो रिक्षा
18,739 ट्रॅक, टेम्पो
45,745 ट्रॅक्टर
32,869 ट्रेलर्स
50,497
इतर

पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर- तांबट कमान ६० कोटी 

शहरात रंकाळा येथे एस. टी. स्टँड आहे. तसेच शहराच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ येतात. पापाची तिकटी हा शहरातील महत्त्वाच्या अशा महाद्वार रोडला जोडला आहे. गावठाण भाग आहे. त्यामुळे पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर आणि तांबट कमान असा उड्डाण पुलाचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी सुमारे ६० कोटींची आश्यकता आहे.

खासबाग ते मिरजकर तिकटी ४ कोटी 

कोल्हापूरच्या गावठाण भागात ऐतिहासिक खासबाग मैदान आहे. त्याबरोबरच या ठिकाणी केशवराव भोसले नाट्यगृहसह अनेक शाळा आहेत. जवळच अंबाबाई मंदिर, भवानी मंडप आहे. केएमटीचा मुख्य बस स्टॉप आहे. त्यामुळे खासबाग ते मिरजकर तिकटी असा उड्डाण पुलाचा आराखडा असून त्यासाठी ४ कोटींची गरज आहे.

जुना टेंबलाई नाका ते मिलिटरी कॅम्प ५० कोटी 

कावळा नाका ते टेंबलावाडी उड्डाण पुलात काही त्रुटी राहिल्या आहेत. कावळा नाका ते मिलिटरी कॅम्पकडे जाताना मध्येच लाईवाडीकडून शहरात येणारी वाहने समोरासमोर येतात. तसेच कावळा नाका ते जुना टेंबलाई नाका येथून राजारामपुरीकडे जाण्यासाठी वाहने वळण घेत असताना मिलिटरी कॅम्पकडून कावळा नाक्याकडे येणारी वाहने समोरासमोर येतात. परिणामी, अपघाताची शक्यता असते. त्यासाठी ६०० मीटर लांबीचा उड्डाण पुलाचा प्रस्ताव असून ५० कोटी खर्च अपेक्षित आहे.

दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी १५० कोटी

शहरात एस. टी. स्टँड ते राजारामपुरीकडे जाण्यासाठी मध्येच रेल्वेलाईन आहेत. त्यामुळे रेल्वे खात्याने ड्रेनेजचे पाणी वाहून जाण्यासाठी काढलेल्या परीख पुलाखालून वाहतूक सुरू आहे. अन्यथा शहराच्या उत्तर-दक्षिण वाहतूक अशक्य आहे. सद्यस्थितीत परीख पूलही मोडकळीस आला आहे. वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी असा १३०० मीटर लांबीचा उड्डाण पुलाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी १५० कोटींची आवश्यकता आहे. दाभोळकर कॉनर ते सासने ग्राऊंड – १० कोटी दाभोळकर कॉर्नर हा शहरातील महत्त्वाचा चौक आहे. दाभोळकर कॉर्नर ते सासने ग्राऊंड असा उड्डाण पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी १० कोटींची गरज आहे.

परीख पूल अंडर पास ५ कोटी

एस. टी. स्टँड ते राजारामपुरीला वाहतुकीने जोडणारा परीख पूल महत्त्वाचा आहे. या पुलाखालूनच वाहतूक सुरू आहे. परंतु दुचाकी, तीनचाकी आणि कार अशी वाहने जाऊ शकतात. टेम्पोसह इतर अवजड वाहने या पुलाखालून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेने तत्काळ म्हणून परीख पुलाला पर्यायी असा भुयारी मार्गाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी ५ कोटींची गरज आहे.

Back to top button