बास्केट ब्रीज : कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचा नवा फ्रेश लूक : महापुरातही शहराशी संपर्क | पुढारी

बास्केट ब्रीज : कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचा नवा फ्रेश लूक : महापुरातही शहराशी संपर्क

कोल्हापूर : डॅनियल काळे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणाऱ्या बास्केट ब्रीजचे काम आता सुरू होणार असून हा बास्केट ब्रीज महामार्गापासून शहरात प्रवेश करणार आहे. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत हा ब्रीज खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे. महापुराच्या काळातही कोल्हापूरला नजीकची शहरे आणि महामार्गापासून कनेक्ट करण्यात हा बास्केट ब्रीज मोलाचे योगदान देणार आहे. शनिवारी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ब्रीजचे भूमिपूजन होणार आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर शहरात प्रवेश करायचा असेल तर सद्यस्थिती पर्यटक आणि इतर नागरिकांनीही कोल्हापूर कोठे आहे, हे शोधावे लागते. एखाद्या खेडेगावात एंट्री करावी, तशा पद्धतीची एंट्री महामार्गावरून कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठीची आहे. त्यातही हा मार्ग अरुंद आणि धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताला निमंत्रण देणारा असा आहे. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करतानाही कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराकडे फारस गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने ही एंट्री अतिशय सामान्य अशी आहे. धार्मिक, ऐतिहासिक असणाऱ्या या शहरात महामार्गावरून नेमका प्रवेश कसा करायचा, हेच समजत नाही. खासदार धनंजय महाडिक यांची पहिली टर्म २०१४ ला सुरू झाली. तेव्हाच त्यांनी या ब्रीजची संकल्पना मांडून तसा डीपीआर तयार केला आणि त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू केला. २०१४ ते २०१९ या काळात त्यांना यामध्ये यश आले नाही. २०१९ मध्ये खासदार महाडिक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला; पण तरीही त्यांनी पाठपुरावा करणे सोडले नाही. अखेर २०२२ मध्ये ते राज्यसभेवर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. त्यांनतर त्यांनी पुन्हा हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता हा बास्केट ब्रीज साकारत आहे.

महापुराचे आठ ब्लॅक स्पॉट होणार दूर

कोल्हापूर शहरात २०१९ आणि २०२१ या दोन्ही वेळच्या महापुरात महामार्गावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर शहराचा संपर्क तुटला होते. २०१९ मध्ये १२ दिवस महामार्ग बंद होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही शहरात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे महापुराच्या काळातही शहर कनेक्ट असणे महत्त्वाचे आहे. याचा विचार करून महामार्गाचे चौपदरीकरण करताना यामध्ये महापुराचेही आठ ब्लॅक स्पॉट आहे. हे ब्लॅक स्पॉट काढले जाणार आहेत. महामार्गाच्या भरावामुळे पाणी या आठ ठिकाणी तुंबते. त्यामुळे आठही ठिकाणी भुयारी मार्ग तयार करून पाण्याला वाट करून दिली जाणार आहे.

ब्रीजची वैशिष्ट्ये

● पंचगंगा नदीवरून शहरात प्रवेश
• महापुराच्या काळातही कोल्हापूरशी संपर्क
कोल्हापूर शहरात सुरक्षित प्रवेश
• महामार्गावरील व शहरात प्रवेश करणारी वाहतूक विभागणार
बास्केट ब्रीजची लांबी १,२७५ कि.मी.
• प्रकल्पाची किंमत १८० कोटी

हेही वाचा : 

Back to top button