अभिनेते किशोर कदम यांना जप्ती वॉरंट, नाशिक मनपाची कारवाई | पुढारी

अभिनेते किशोर कदम यांना जप्ती वॉरंट, नाशिक मनपाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या महापालिका प्रशासनाकडून घरपट्टी वसुलीची जोरदार मोहीम राबविली जात असून, घरपट्टी थकविलेल्यांना जप्ती वॉरंट बजावले जात आहे. त्यामध्ये आता अभिनेते तथा कवी किशोर भानुदास कदम ऊर्फ सौमित्र यांचे नावही जोडले गेले आहे. होय, किशोर कदम यांना महापालिकेने जप्ती वॉरंट बजावले असून, वॉरंट प्राप्त होताच कदम यांनी शुक्रवारी (दि.२७) महापालिका मुख्यालयातील करवसुली विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत कर भरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मनपाने कारवाई थांबविली आहे.

मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने ७६ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविली असून, बड्या थकबाकीदारांची नावे मनपाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहेत. काही दिवसांपूर्वी या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाओ मोहिमहीदेखील राबविण्यात आली होती. या मोहिमेमुळे तब्बल १० कोटींची थकबाकी वसूल करण्यात पालिकेला यश आले होते. परंतु आकडा मोठा असल्याने आता प्रशासनाने जप्ती वॉरंट बजाविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, अभिनेते किशोर कदम यांचे नाशकातील गंगापूर रोड भागात निवासस्थान आहे. हे निवासस्थान खरेदी केल्यापासून गेल्या पाच ते सहा वर्षे महापालिकेची सुमारे ३५ हजारांची घरपट्टी थकीत होती. मूळ मालकाने यासंदर्भात कदम यांना पूर्वकल्पना दिलेली नव्हती. पालिकेने जप्ती वॉरंट बजावल्यानंतर या थकबाकीविषयी कदम यांना कळाले. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी महापालिकेत धाव घेत करवसुली विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन थकीत कर भरण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मिळकत जप्तीची पुढील कारवाई टळल्याचे सूत्रांनी सांगितले.

३०५ थकबाकीदारांना जप्ती वॉरंट

गेल्या पंधरवड्यात मनपाने सहाही विभागांतील ३०५ थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले आहेत. त्यापैकी १० थकबाकीदारांनी पूर्ण तर ४६ थकबाकीदारांनी अंशत: थकबाकी भरली आहे. जप्ती वॉरंटद्वारे मनपाला ४५ लाखांची थकबाकी वसूल करण्यात यश आले आहे. थकबाकी न भरणाऱ्यांच्या मिळकती जप्ती करून लिलाव केला जाणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button