खेड तालुक्यात 25 ग्रामपंचायतींची निवडणूक; प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत पंचवार्षिक मुदत संपलेल्या खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील एकूण 233 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवासी जिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
निवडणूक होणार्या खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीची नावे पुढीलप्रमाणे : गोरेगाव, सुपे, कोहिनकरवाडी, वरुडे, सातकरस्थळ, पिंपळगाव तर्फे खेड, गाडकवाडी, होलेवाडी, निघोजे, सांडभोरवाडी, कोळीये, वहागाव, परसूल, देशमुखवाडी, मोरोशी, डेहणे, आडगाव, वाळद, वाघू, एकलहरे, तिफणवाडी, धुवोली, भोमाळे, संतोषनगर, वाकी बु. मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली असून, 30 जानेवारी रोजी नकाशे तयार करून प्रत्येक गावचे नकाशे अंतिम करणे, 7 फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडून सीमा निश्चित करणे, 21 फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविणे, 3 मार्चला जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभागरचनेची संक्षिप्त तपासणी करून दुरुस्त्या करून मान्यता दिल्यानंतर 17 मार्चला प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेबाबत आराखडा प्रसिद्ध करून हरकती व सूचना 24 मार्चपर्यंत मागविणे, गावनिहाय प्राप्त हरकती आणि सूचनांवर प्रांताधिकारी 6 एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहेत.
त्यावर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झाल्यानंतर 17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी प्राप्त प्रस्ताव तपासल्यानंतर अंतिम प्रभागरचना करून निवडणूक आयोगाकडे पाठवतील. 25 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.