कोल्हापूर : शेत बळकविण्याप्रकरणी पेटवडगावमधील तिघांना अटक | पुढारी

कोल्हापूर : शेत बळकविण्याप्रकरणी पेटवडगावमधील तिघांना अटक

पेठवडगाव; पुढारी वृत्तसेवा : किणी (ता.हातकणंगले) येथील शेत बळकविण्याप्रकरणी पेठवडगाव येथील राजवर्धन उर्फ राज बाबासाहेब पाटील (रा. पेठवडगाव ता.हातकणंगले)  याच्यासह त्‍याच्‍या दोन साथीदारांना अटक करण्‍यात आली. या प्रकरणी राजाराम तुकाराम पाटील (वय ४८, रा. चांदोली वसाहत,किणी ता.हातकणंगले ) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याप्रकरणी  राजवर्धन उर्फ राज पाटील याचेसाथीदार राकेश नवनाथ हाके (रा.पेठवडगाव), शामराव पाटील (रा.ताबवे वसाहत पेठवडगाव) या दोघांना गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटकेच्या कारवाईनंतर संशयित आरोपी पाटील याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी राजाराम पाटील यांनी आपल्‍या नातेवाईकांकडून सन २०११ साली पुनर्वसन जमीन रोख रक्कम देऊन नोकरी वजा खरेदी केली होती. जमिनीचे मूळ मालक शामराव पाटील व संभाजी पाटील यांनी पेठवडगाव येथील राजवर्धन उर्फ राज बाबासाहेब पाटील याला शेत जमीन बळकविण्याची सुपारी दिली होती. यानुसार त्‍याने आपल्‍या साथीदारांच्‍या मदतीने फिर्यादीला वेळोवेळी शेतात जाण्यासाठी अटकाव करत शिवीगाळ केली होती.  दरम्यान, १६ जानेवारी रोजी राजवर्धन पाटील आणि त्याचा हस्तक राकेश हाके यांनी फिर्यादीचा मावसभाऊ शंकर माडशिंग याला फोन वरून शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्यानंतर त्यांच्या घरात घुसून माडशिंग आणि फिर्यादी पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती.

राकेश हाके याने फिर्यादी पाटील यांना जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून काही अंतरावर नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती.जमीन बळकविण्यासाठी राजवर्धन पाटील याने दि. २४ जानेवारीला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमाऱ्यास आपल्‍या १५ ते २० साथीदारांच्‍या मदत्‍ने शेतात शिरून शेताचे ट्रॅकटरच्या सहाय्याने करून नुकसान केले. याला विरोध केल्‍याने फिर्यादी राजाराम पाटील यांचे  हात दोरीने बांधून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजवर्धन पाटील, राकेश हाके, शामराव पाटील, संभाजी पाटील, अतिश पाटीलसह यांच्‍यासह २५ ते ३० जणांविरुद्ध  राजाराम पाटील यांनी फिर्यादी दिली होती. या प्रकरणाची  नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून, तपास स.पो.नि. भीमगोंडा पाटील करीत आहे.

फोन खणखणले……

शेत बळकविण्याची फिर्यादी राजाराम पाटील यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली. यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने स.पो.नि. भीमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गुरुवारी रात्री मध्यरात्री राजवर्धन पाटील याला अटक केली. अटकेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने त्‍याच्‍या समर्थकांनी पोलीस ठाणे समोर धाव घेतली. दरम्यान, पाटील याची अटक थांबविण्यासाठी काही लोकप्रतिनिधीचे फोन खणखणल्याची चर्चाही पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती.

छातीत दुखू लागल्याने राज ऍडमिट….

शेत बळकविल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपी राजवर्धन पाटील याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा;

Back to top button