नाशिक : रस्‍ता ओलांडणाऱ्या पादचारी तरूणाला एसटी बसने चिरडले - पुढारी

नाशिक : रस्‍ता ओलांडणाऱ्या पादचारी तरूणाला एसटी बसने चिरडले

नाशिक; पुढारी वृत्‍तसेवा : रस्‍ता ओलांडणाऱ्या पादचारी तरूणाला एसटी बसने चिरडल्‍याची घटना घडली. गुंजाळनगर (ता. देवळा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास नाशिकहून साक्रीकडे जाणाऱ्या तरूणाला एसटी बसने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अनिल एकनाथ पानपाटील (वय ३०, रा. गुंजाळनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरूणाला एसटी बसने चिरडले हे समजताच परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साक्री आगाराची बस (एम.एच.१३ सी.यू. ७३०६) नाशिकहून साक्रीकडे जात होती.

गुंजाळ नगरजवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बोगद्याजवळ रस्ता ओलांडत असलेल्या अनिल पानपाटील या पादचाऱ्याला एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

लहुजी शक्ती सेनेचे दीपक पानपाटील यांचे ते बंधू होत. या घटनेमुळे वाहनांचा वेगावर नियंत्रण नसल्याबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मृत तरुणाचे मामा रमेश सुखदेव साबळे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी, शरीफ शेख, अरुण आहिरे करीत आहेत.

Back to top button