नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

बिबट्या www.pudhari.news
बिबट्या www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मानव आणि बिबट्या संघर्ष वाढला आहे. विशेषत: दारणा खोऱ्यालगत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबद्दल, मानव-बिबट्या परस्परसंबंध यांची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमधील भीती कमी होऊन त्यांना हा विषय जास्तीत जास्त समजावा यासाठी 'जाणता वाघोबा' उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून शंभर विद्यार्थ्यांची बिबट्यादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक पश्चिम वनविभाग, वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी आणि कॉन्झर्व्हेशन लिडरशीप प्रोगॅम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.२५) 'पत्रकार संवाद कट्टा' या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाशिकमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'जाणता वाघोबा' उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, मानद वन्यजीवरक्षक वैभव भोगले आणि अक्षय मांडवकर उपस्थित होते. यावेळी भोगले यांनी 'जाणता वाघोबा' उपक्रमासंदर्भात माहिती दिली.

वाढत्या मानव आणि बिबट्या संघर्षावर 'जुन्नर पॅटर्न'ची मात्रा वापरली जात आहे. प्रबोधन हा संघर्षाची तीव्रता कमी करण्याचा सर्वांत सोपा मार्ग असून, त्याला जुन्नरमध्ये यश प्राप्त झाले आहे. याच पॅटर्नची नाशिकमध्ये अंमलबजावणी होत आहे. आतापर्यंत 'जाणता वाघोबा' उपक्रमांतर्गत तीस गावांमध्ये बिबट्या-मानव सहजीवनाबाबत जागरूकता करण्यात आली आहे. विल्होळी व आंबेबहुला या दोन गावांतून शंभर विद्यार्थी बिबट्यादूत म्हणून कार्य करीत आहेत. त्या माध्यमातून बिबट्यासोबतच्या सुरक्षितरीत्या जगण्यासाठी प्रबोधन केले जात असल्याचे मानद वन्यजीव रक्षक भोगले यांनी सांगितले.

बिबट्यादूत करताय जनजागृती….
'जाणता वाघोबा' उपक्रमाद्वारे बिबट्याचा बदललेला अधिवास, जीवनशैली, हल्ल्याचे कारण व पद्धतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येते. चित्रफीत व पोस्टर्स देत विद्यार्थ्यांना घरी व गावात प्रबोधनासाठी तयार केले जाते. या माध्यमातून बिबट्या आता घराजवळच्या जंगलात, शेतात राहणार असून, त्याच्या समवेत सुरक्षितरीत्या जगण्याबाबत जागरूक केले जात आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात स्वतःची आणि स्वतःच्या पशुधनाची काळजी घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, अशा स्वरूपाची माहिती बिबट्यादूत मांडत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news