चिंचवड, पुढारी ऑनलाईन: चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा पक्षाचा प्रयत्न आहे, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आज चिंचवडमध्ये भाजपने विधानसेभेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवली होती. त्यावेळी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच बैठकीत चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा भाजपचा उमेदवार निश्चित ठरण्याची शक्यता होती. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उमेदवार ठरवण्यासाठीची ही बैठक नव्हती. कोअर कमिटीकडून आणि पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून केंद्रात निर्णय होत असतो. त्यामुळे दोन्ही उमेदवार दिल्लीतून केले जातील. आजच्या या बैठकीत सखोल चर्चा झाली की, इतर पक्षात काय चाललंय? आणि ते काय करणार आहेत? ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणाशी आणि कशी बोलणी करणं अपेक्षित आहे. त्याबरोबरीने गेल्या निवडणुकीत कोणत्या बुथवर कमी मतं होती, त्यात वाढ व्हावी यासाठी काय करता येईल? याबाबत यात चर्चा झाली. पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ दोन्ही शहरातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतील. या बैठकीत कामाची विभागणी करण्यात आली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
राजकारणात इच्छा असणं हा काही गुन्हा नाही. त्याप्रमाणे अनेकांची इच्छा असू शकते. आम्ही सर्वजण सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतो. इतर पक्षासारखं आम्ही प्रासंगिक संपर्कात राहत नाही, असा टोला पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे सर्व इच्छूक उमेदवारांशी संपर्क साधतील, असंही ते म्हणाले. या बैठकीला मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू लक्ष्मण जगताप, पत्नी अश्विनी जगताप यांच्यासह चिंचवडचे स्थानिक भाजपनेते उपस्थित होते. या पोटनिवडणूकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दिवंगत आमदार जगताप यांच्या कुटुंबातील एका सदस्याला चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.