नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार | पुढारी

नाशिक : सोनोग्राफी मशीन प्रकरणी डॉ. भंडारी दाम्पत्य दावा दाखल करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड येथे अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन बाळगल्याचा ठपका ठेवून महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, संबंधित रुग्णालयाची इमारत स्वमालकीची असली तरी ती जागा भाडेतत्त्वावर दिलेली होती. या प्रकरणात झालेली कारवाई चुकीची असून, त्यातून बदनामी झाली आहे. त्यामुळे लवकरच संबंधितांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा डॉ. राजेंद्र व सुनीता भंडारी दाम्पत्याने पत्रकार परिषदेत देत सर्व आरोप फेटाळून लावले.

सन 2020 पासून रुग्णालयाची इमारत डॉ. विजय पवार, स्वप्निल इंगळे यांना पाच वर्षे भाडेकराराने दिली आहे. भाडेकरार करताना आम्ही रुग्णालयाचा परिसर, सर्व साहित्य, मेडिकल दुकान व कारवाईत आढळून आलेली सोनोग्राफी मशीनदेखील रुग्णालयाच्या संचालकांकडे सुपूर्द केली आहे. याशिवाय कारवाईदरम्यान आढळून आलेली सोनोग्राफी मशीन महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने सील करावी. सदर मशीन आमच्या कोणत्याही उपयोगाची नाही, असा अर्ज दि. 7 जानेवारी 2008 रोजी महापालिकेला दिला होता. त्या अर्जावर अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नसल्याचे डॉ. भंडारी यांनी सांगितले. मनपा आरोग्य व वैद्यकीय विभागासह जिल्हा रुग्णालय, नाशिक तहसीलदारांनी 16 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त कारवाई करत टू केअर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील केले. या रुग्णालयाच्या परवान्याची नोंद डॉ. पवार यांच्या नावाने असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वैध आहे. रुग्णालय नोंदणीवेळी करारनाम्याची प्रत मनपाला सादर केली आहे. तरीदेखील माझ्यावर चुकीची कारवाई करण्यात आल्याचा दावा डॉ. भंडारी यंनी केला.

दुसर्‍याही शिस्तभंग नोटिसीची तयारी…
मनपा वैद्यकीय विभागाने डॉ. राजेंद्र भंडारी हे पालिकेच्या वैद्यकीय सेवेत असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी नोटीस बजावल्या आहेत. डॉ. भंडारी यांनी सोमवारी (दि.23) पत्रकार परिषद घेऊन खुलासा करत आपली बाजू मांडली. मात्र, हा खुलासा आता त्यांच्या अंगलट येणार आहे. मनपाच्या सेवेत असताना परवानगी न घेता, तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद घेतल्याने त्यांना आता दुसर्‍यांदा शिस्तभंगाची नोटीस पाठविण्याची तयारी वैद्यकीय विभागाने केली आहे.

हेही वाचा:

Back to top button