पिंपरी : आचारसंहितेमुळे ‘जनसंवाद’ बंद; जल्लोष शिक्षणाचा महोत्सवाचे होणार आयोजन | पुढारी

पिंपरी : आचारसंहितेमुळे ‘जनसंवाद’ बंद; जल्लोष शिक्षणाचा महोत्सवाचे होणार आयोजन

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने जनसंवाद सभा रद्द केली आहे. मात्र, विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी जल्लोष शिक्षणाचा हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यावर तब्बल सहा ते सात कोटींचा खर्च केला जाणार आहे. या कार्यक्रमात चिंचवड मतदार संघातील अनेक शाळा सहभागी होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग होऊ शकतो, अशी शंका पालिका वर्तुळात उपस्थित केली जात आहे. भाजपचे चिंचवड मतदारसंघाचे आ. लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारीला निधन झाले.

मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.18) त्या ठिकाणी व पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली. तेव्हापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. नागरिकांशी संवाद नको म्हणून पालिकेच्या वतीने सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयात आयोजित केली जाणारी जनसंवाद सभा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे.

मात्र, दुसरीकडे पालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रम खासगी एजन्सीच्या माध्यमातून राबविला जात आहे. त्यासाठी तब्बल 6 ते 7 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. उत्कृष्ट शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

पालिकेचा जनसंपर्क विभाग असताना, या कार्यक्रमाच्या दोन दिवसांच्या प्रसिद्धीसाठी खासगी एजन्सीवर कोट्यवधीची उधळपट्टी केली जाणार आहे. निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पालिकेकडून विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. ही बाब आचारसंहिता भंग करणारी ठरू शकते, यासंदर्भात पालिका व शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

हा उपक्रम राजकीय नसून, शिक्षणविषयक
हा उपक्रम राजकीय नसून, शिक्षणविषयक उपक्रम आहे. कार्यक्रम चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर आहे. कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांना बोलविले आहे. विभागीय आयुक्त, शिक्षण आयुक्त व सचिव आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ व अधिकार्‍यांना निमंत्रित केले आहे. जिल्हा परिषदेच्या काही शाळांही सहभागी होत आहेत. पालिकेच्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे आचारसंहिता भंग होत नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

Back to top button