शिवशक्ती-भीम शक्ती एकत्र याव्यात हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं : संजय राऊत

मुंबई ; पुढारी ऑनलाईन हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. त्या निमित्त महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कितीही राजकारण झालं तरी सर्वांच्या हृदयावर कोरलेले बाळासाहेब अजरामर आहेत. दरम्यान आज महाराष्ट्रात मोठी क्रांतीकरी घोषणा होईल. आज शिवशक्ती आणि भीम शक्ती एकत्र येतील. हे देशाच्या राजकारणातील एक मोठे क्रांतीकारी पाउल असेल, अशी भावना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जगभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येकाच्या हृदयात अजरामर आहेत. बाळासाहेबांनी अनेकांना मोठी पदं दिली. सामान्यातील सामान्याला राजकीय पाठबळ नसताना बाळासाहेबांनी नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री बनवले. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला कानमंत्र दिला. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबतच प्रत्येक राज्यातील कष्टकरी आणि सर्वसामान्य भूमीपुत्राला कानमंत्र दिला.
आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहेत. देशाच्या राजकारणातील हे क्रांतीकारी पाउल असेल. शिवशक्ती आणि भीम शक्ती एकत्र यावेत हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, असे राउत म्हणाले. कोणी म्हणत असेल आमच्या सोबत महाशक्ती आहे. पण आताच्या आमच्या महायुतीसमोर कोणीही टिकाणार नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. तसेच यापुढेही शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेच राहतील, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा :