अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गरीब मराठे आणि इतर मागासवर्गीय सत्तेत आल्यास श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या भीतीमुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतले जात नसल्याचा आरोप पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी पदवीधर निवडणुकीबाबत धनशक्ती व घराणेशाहीविरोधात आपला लढा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने रतन बनसोड यांची उमेदवारी जाहीर केली. यानिमित्ताने शनिवारी (दि.21) पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, पदवीधरांच्या प्रश्नांवर 40 वर्षांपासून आम्ही भांडतो आहे. नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचा उमेदवार नसताना शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाशी संपर्क साधत हुशारी दाखविल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेनेसोबत आमची चर्चा चालू असून, आमचे नाते अजून जमले नाही. सध्या फक्त एकमेकांवर लाइन मारणे सुरू असून, एकमेकांना कधी पटू हे आमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पदवीधरकरिता पाटील यांना पाठिंबा देण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. चर्चेअंती एकमेकांना शब्द दिल्यानंतरच शिवसेनेने दिलेल्या उमेदवारावर बोलता येईल, असे सुचक वक्तव्य आंबेडकर यांनी केले. राज्यातील मविआमध्ये वंचितच्या समावेशाबाबत आंबेडकर यांना विचारले असता उद्धव ठाकरे त्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना श्रीमंत मराठ्यांची सत्ता जाण्याची भीती आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी किती दिवस प्रयत्न करावे, यालादेखील मर्यादा असल्याचे ते म्हणाले. चर्चेसाठी वंचित बहुजन आघाडी पुढे जाऊन चर्चा करणार का असे विचारले असता याबद्दल काँग्रेसला विचारावे. मी पुष्पहार घालण्यास तयार आहे. काँग्रेसने मान पुढे केली पाहिजे, असा खोचक टोला आंबेडकर यांनी लगावला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार व शहराध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीला संधी
नागपूर व लातूरमध्ये वंचितची परिस्थिती चांगली आहे. नाशिकमध्ये धनशक्ती व घराणेशाहीला पदवीधर कंटाळल्याने वंचितला संधी आहे. जुनी पेन्शन योजना व शिक्षण या दोन मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास अ‍ॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, महापालिका निवडणुकीचे निमित्त साधत भाजपने मुंबईत मेट्रोचे एकदा नव्हे दोनदा उद्घाटन केल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news