नगर : अंगणवाडी बांधकामांना मरगळ ; 165 पैकी केवळ 9 कामे पूर्ण | पुढारी

नगर : अंगणवाडी बांधकामांना मरगळ ; 165 पैकी केवळ 9 कामे पूर्ण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये घेतलेल्या 165 अंगणवाड्यांच्या कामांना जुन्या प्रशासकीय मान्यतेप्रमाणे प्रत्येकी साडेआठ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र सहा महिने उलटून गेली, तरीही अंगणवाडी बांधकामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. या कालावधीत जिल्ह्यातील केवळ 9 अंगणवाडी बांधकामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, बांधकाम साहित्याचे आज वाढते दर पाहता जुन्या रेटनुसार कामे करावे लागत आहेत. त्यामुळे ठेकेदारही फारसा उत्साही दिसत नाही. झेडपीत पदाधिकारी असताना शेवटच्या टप्प्यात165 अंगणवाड्यांच्या बांधकामांना मंजूरी देण्यात आली होती. यावेळी केलेल्या अंदाजपत्रकानुसार प्रत्येक अंगणवाडीसाठी साडेआठ लाखांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर ही कामे सुशिक्षीत बेरोजगार, मजूर संस्था आणि ग्रामपंचायत यांना वाटण्यात आली.

ग्रामपंचायतींच्या नावे 77 कामे 
दक्षिण बांधकाम विभागाअंतर्गत नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात 74 कामांना मंजूरी दिली होती. यातील ग्रामपंचायतींना 27 कामांचे वाटप करण्यात आले, तर 47 कामे अन्य यंत्रणेला देण्यात आलेली आहे. तर उत्त्तर विभागातील राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, राहाता, काोपरगाव, संगमनेर व अकोले तालुक्यात 91 अंगणवाडी कामे घेण्यात आली होती. यातील ग्रामपंचायतींना 50, तर अन्य यंत्रणेतून मजूर संस्था, सुशिक्षीत बेरोजगार अशी 34 कामे वाटलेली आहेत.

दक्षिणेत 6; उत्तरेत 3 कामे पूर्ण
गत वर्षीच्या या 165 अंगणवाडी कामांसाठी साडेआठ लाखांची तरतूद आहे. मात्र सिमेंट, स्टील, वाळू, खडी, मजूर याचे दर वाढतेच आहेत. त्यामुळे साडेआठ लाखांत अंगणवाडीचे चांगल्या दर्जाचे बांधकाम करणे जिकरीचे आहे. परिणामी, दक्षिणेत 74 पैकी आतापर्यंत केवळ सहा कामे पूर्ण झाली असून, अन्य कामे कासवगतीने सुरू आहेत. उत्तरेतही काही वेगळी परिस्थती नाही. उत्तरेतील91 मंजूर कामांपैकी 84 कार्यारंभ आदेश देण्यात आलेेले आहेत. यापैकी तीन कामे पूर्ण झालेली असून, अन्य कामे संथगतीनेच सुरू आहेत. यातील सहा कामे ही बदली घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.

नवीन अंगणवाड्यांना  सव्वा अकरा लाख
गतवर्षीच्या तुलनेत आता अंगणवाडी बांधकामाला 11 लाख 25 हजार रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे यातून कामे चांगल्या दर्जाची होणार आहेत, तर पूर्वीच्या साडेआठ लाखांमध्ये अंगणवाडीची कामे कशी होणार असा प्रश्न पुढे आला आहे.

जलजीवनला सुप्रमा; अंगणवाडीला का नाही?
जलजीवन योजनेत प्रारंभी जुन्या दराने प्रशासकीय मान्यता झालेल्या होत्या. तर दुसरीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले. त्यामुळे ठेकेदारांनी काम करण्यासाठी निरुत्साह दाखवला. परिणामी, सुधारीत प्रशासकीय मान्यता देवून त्या कामांसाठी निधीची तरतूद केली होती. त्यामुळे अंगणवाडीसाठीही मुलांच्या आयुष्याचा विचार करून सुप्रमा करण्यात याव्यात, अशी मागणी होताना दिसत आहे.

 

अंगणवाड्यांचे बांधकाम साडेआठ लाखांत होऊ शकत नाही. स्वच्छतागृह, किचन, स्टोअर रुम, हॅण्डवॉश स्टेशन इत्यादी काम आहेत. निकृष्ठ काम झाल्यास निंबोडीसारख्या दुर्घटनेची भिती आहे. त्यामुळे नव्या अंदाजपत्रकानुसार निधी मिळाला तर चांगली कामे करून घेता येतील. मी तशी मागणी केलेली आहे.
                         – मीराताई शेटे, माजी सभापती महिला व बालकल्याण

जिल्ह्यातील अंगणवाडीच्या बांधकामाबाबत दक्षिण आणि उत्तरेच्या कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून काम घेतलेल्या संबंधित ठेकेदारांना, संस्थांना आवश्यक त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास आहे.

                           – संभाजी लांगोरे, अतिरिक्त सीईओ, जिल्हा परिषद

 

 

 

Back to top button