नाशिक : एकाच महिलेसोबतच्या प्रेमसंबंधावरून झाले होते वाद, तरुणाच्या खुनप्रकरणी दोघे गजाआड | पुढारी

नाशिक : एकाच महिलेसोबतच्या प्रेमसंबंधावरून झाले होते वाद, तरुणाच्या खुनप्रकरणी दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओझर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरनगर येथे ३२ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणी पाेलिसांनी दोघांना अटक केली आहे. मृत झालेला तरुण आणि मारेकऱ्याचे एकाच महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याने त्याचा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

आंबेडकरनगर येथे प्रमोद दत्तू निकाळजे (३२, रा. ओझर) याचा मृतदेह १२ जानेवारीला आढळला होता. या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, ओझरचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पथक नेमले होते.

गुन्ह्याच्या दिवशी प्रमोद कोणाला भेटला, त्याला शेवटचे कोणासोबत पाहिले यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता, ओझर येथील जयेश भंडारे व रावसाहेब उर्फ संदीप बनसोडे यांच्याशी प्रमोदचे वाद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी १२ जानेवारीला मध्यरात्री प्रमोदवर तलवार, चॉपरने वार करून जिवे मारल्याची कबुली दिली. प्रमोद निकाळजे आणि जयेश भंडारे यांचे ओझर येथील एकाच महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याने जयेशने त्याच्या मित्रासह मिळून प्रमोदचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक अर्चना तोडमल, अंमलदार किशोर आहेरराव, विश्वनाथ धारबळे, दीपक गुंजाळ, अनुपम जाधव, बंडू हेगडे, जितेंद्र बागूल, रमेश चव्हाण, झांबरू सूर्यवंशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक उमाप यांनी तपास करणाऱ्या पथकास १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हेही वाचा :

Back to top button