पुणे : वादापेक्षा खेळावर लक्ष दिले पाहिजे : शरद पवार | पुढारी

पुणे : वादापेक्षा खेळावर लक्ष दिले पाहिजे : शरद पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे निमंत्रण होते, परंतु मलाही काही महत्त्वाचे काम असल्याने उपस्थित राहू शकलो नाही. महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचा वाद कोर्टात आहे, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. आपण खेळावर लक्ष दिले पाहिजे, इतर बाबींवर जास्त चर्चा करायला नको, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले. महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. शिवराजला सांगायचे आहे की, महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा असून, यानंतर राष्ट्रीय, आशिया स्पर्धा आणि देशाच्या संबंध कुस्तीप्रेमींचे स्वप्न असलेल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा आहेत.

योगायोगाने आज खाशाबा जाधव यांची जयंती आहे. त्यांनी सर्वांत आधी ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदक मिळवले होते. त्यानंतर इतक्या वर्षांत महाराष्ट्रातून कुणीही पदक मिळवले नाही. आमची इच्छा आहे की, शिवराजने भारतासाठी पदक मिळवावे. आतापर्यंत मी आणि माझा परिवार अनेक खेळांना आणि खेळांडूंना पाठीमागून मदत करण्याची भूमिका घेत आले आहे. क्रिकेटसाठीही मी काम केले आहे.

पण कुस्तीसाठी मी विशेष प्रयत्न करत आलो आहे. 25 ते 30 वर्षांपासून मी महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. सर्व कुस्तीतील पहिलवान हे ग्रामीण भागातून येतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अडचणींवर मात करून मल्ल यश मिळवतात. या मल्लांना उत्तम प्रशिक्षणाचीही गरज असते. ती जबाबदारी काका पवार यांनी उचलली आहे, असेही पवार म्हणाले.

Back to top button