प्लॅटफॉर्मच्या जिन्यावर गर्दीचा ‘महापूर’; पुणे रेल्वे स्थानकावरील स्थिती | पुढारी

प्लॅटफॉर्मच्या जिन्यावर गर्दीचा ‘महापूर’; पुणे रेल्वे स्थानकावरील स्थिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 4 व 5 वर अतिरिक्त गाड्या येत असतात. त्यामुळे येथे ’पिक अर्वस’मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते. प्रवाशांमध्ये पुढे जाण्यावरून येथून अक्षरश: धक्काबुक्कीचे प्रकार घडत असून, त्यामुळे अनेक रेल्वप्रवासी हैराण झाले आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून मागील पार्किंगमध्ये उतरण्यासाठी फूटओव्हर ब्रिज आहे.

त्या ब्रिजवरून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 वर उतरण्यासाठी एक जिना आहे. त्या जिन्यावर मोठी गर्दी होते. अलीकडे हडपसर आणि शिवाजीनगर येथे टर्मिनल सुरू करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टिकोनातून या स्टेशनचा विकास झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी हेाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या घडीला पुणे रेल्वे स्थानकावर एकदम गाड्या आल्या की येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.

म्हणून होते या जिन्यावर गर्दी
प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 वर उतरणारा जिना मुळात अरूंद आहे. त्यासोबतच बाहेरून येणार्‍या अनेक महत्त्वाच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबतात. त्यामुळे अनेक गाड्यांतील प्रवाशांच्या गर्दीने येथे उतरणार्‍या जिन्यावर चढ-उतार करणार्‍या नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच, परिणामी, धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमकीदेखील घडत आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 वर अतिरिक्त गाड्या आल्यामुळे येथे असलेल्या जिन्यावरून उतरण्यासाठी गर्दी होत आहे, त्यामुळे प्रवाशांनी येथे असलेल्या अन्य जिन्यांवरून, फूटओव्हर ब्रिजवरून प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 वर जावे. तसेच, आरामात जिन्यावरून उतरावे, इतर प्रवाशांना धक्का-बुक्की करू नये.

                       मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

आम्ही अनेकदा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर रॅम्प बसविण्याची वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे गांभीर्याने पहात नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 वर होणारे प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी उपाययोजना तातडीने कराव्यात.
                     निखील काची, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती पुणे विभाग

Back to top button