चोवीस तासांत पुन्हा पाऱ्यात घसरण; निफाड, नाशिकमध्ये वाढला थंडीचा कडाका | पुढारी

चोवीस तासांत पुन्हा पाऱ्यात घसरण; निफाड, नाशिकमध्ये वाढला थंडीचा कडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरात शनिवारी (दि. १४) किमान तापमान ८.८ अंशांवर स्थिरावला. हवामानात अचानक झालेल्या या बदलाने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. निफाडचा पाराही पुन्हा एकदा ५.५ अंशांपर्यंत खाली आला असून अवघ्या तालुक्यात थंडी परतली आहे.

उत्तर भारतामधील राज्यांमध्ये थंडीची लाट पसरल्याचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्याच्या हवामानावरही झाला आहे. नाशिकमधील किमान तापमानाच्या पाऱ्यात अवघ्या २४ तासांमध्ये ४.२ अंशांची घसरण होत तो ९ अंशांखाली आला आहे. पाऱ्यातील या बदलामुळे शहरवासीय गारठले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपड्यांसह शेकोट्यांभोवती गर्दी करत आहेत. निफाडमधील कुंदेवाडीच्या गहू संशोधन केंद्रात ५.५ अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीचा परिणाम अवघ्या तालुक्यात जाणवत आहे. वातावरणातील सततच्या बदलाचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. गहू, हरभरा पिकांसाठी हे वातावरण पोषक असून, या हवामानामुळे अन्य पिकांवर विविध रोग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला आहे. उत्तरेकडून येणारा थंडीचा वेग येत्या काळात कायम राहणार आहे.

हेही वाचा:

Back to top button