अभय कुरूंदकर-अश्विनी बिद्रेंनी केले होते लग्न

अभय कुरूंदकर-अश्विनी बिद्रेंनी केले होते लग्न
Published on
Updated on

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या करणारा बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याने अश्विनी बिद्रे यांच्यासोबत लग्न केल्याचा पुरावा ठरणारा स्टॅम्पपेपर शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात सादर करण्यात आला. हा स्टॅम्पपेपर या घटनेमधील पंच आणि अश्विनी बिद्रे यांचे वडील जयकुमार बिद्रे यांनी न्यायालयासमोर ओळखला.

शुक्रवारी या पंचांची साक्ष आणि उलटतपासणी पनवेल सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश न्या. के. जी. पालदेवार यांच्यासमोर घेण्यात आली. अभय कुरूंदकर याने स्वतः स्टॅम्पपेपरवर मी स्वतः अश्विनीसोबत लग्न करत असल्याचे लिहून दिल्याचा मजकूर दिसून येत आहे.

महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर नवी मुंबई पोलिसांनी हत्येचा तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामध्ये हत्या करण्यासाठी त्याच्या मित्राने कशी मदत केली, हत्या करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले आणि हे शस्त्र कुठून विकत घेतले, याचा शोध नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. हे सर्व पुरावे पनवेल सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्या पुराव्यांच्या अनुषंगाने उलटतपासणी व साक्षदेखील न्यायालयात नोंदविण्यात आली आहे. या पुराव्यांसोबत शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात महत्त्वाचे पंच आणि साक्षीदार अश्विनी बिद्रे यांचे वडील जयकुमार बिद्रे यांची साक्ष नोंदवण्यात आली.

अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर नवी मुंबई पोलिस दलातील, तळोजा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक माने यांनी बिद्रे यांच्या कोल्हापूर येथील राहत्या घराची झाडाझडती घेतली होती. या झाडाझडतीत माने यांना सन 2014 मधील एक 100 रुपयांचा स्टॅम्पपेपर आढळून आला होता. या स्टॅम्पपेपरवर 'मी, अभय शामसुंदर कुरूंदकर प्रतिज्ञापत्राद्वारे कथन करतो की, मी अश्विनी बिद्रे हिच्याबरोबर स्वखुशीने लग्न केले आहे,' असा मजकूर पोलिसांना मिळून आला होता. हा मजकूर स्वतः अभय कुरूंदकर याने लिहिला होता. हा स्टॅम्पपेपर आढळून आला त्यावेळेस घरात उपस्थित असलेले अश्विनी यांचे वडील जयकुमार बिद्रे यांची साक्ष नोंदविण्यात आली, हा स्टॅम्प न्यायालयासमोर दाखवण्यात आला त्यावेळेस साक्षीदार आणि पंच जयकुमार बिद्रे यांनी हे पेपर ओळखले. त्यासोबत काळा आणि गोल्डन कलर असलेला पेनकॅमेरा, सोनी लिहिलेला पेनड्राईव्हदेखील त्यावेळी घरझडतीत मिळाला होता. तोही माझ्यासमोरच जप्त करून लखोट्यात सील केला होता, अशी साक्ष देऊन तो आज न्यायालयात जयकुमार बिद्रे यांनी ओळखला. बिद्रे यांच्यानंतर कुरूंदकर याच्या घरात काम करणार्‍या रेखा गोपाल गौंड यांची साक्ष आणि उलटतपासणीदेखील शुक्रवारी पूर्ण झाली.

खटल्याची पुढील सुनावणी 20 जानेवारी 2023 रोजी असल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news