केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार : माता व बालसंगोपन रुग्णालय, आरोग्यासाठी 250 कोटी | पुढारी

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार : माता व बालसंगोपन रुग्णालय, आरोग्यासाठी 250 कोटी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सुसज्ज असणे आवश्यक असल्याचे ओळखून नाशिक विभागात आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भरीव निधीची तरतूद केल्याची माहिती दिली.

पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (पीएम अभियान)अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज क्रिटिकल केअर रुग्णालय तसेच इंटिग्रेटेड हेल्थ पब्लिक लॅबरोटरी क्रिटिकल केअर हॉस्पिटलला मंजुरी मिळावी, तसेच तळागाळातील गरजू रुग्णांना सर्वसमावेशक व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता ना. डॉ. पवार यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य लाभल्याने राज्यस्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान संसर्गजन्य रोगांवरील संशोधन प्रदान करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधांची क्षमता व सुसज्जता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. आपत्कालीन परिस्थितींसह इतर कोणत्याही परिस्थितीसाठी गंभीर देखभालीची गरज असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करणार असल्याचे ना. डॉ. पवार यांनी सांगितले. आदिवासी बहुल तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या दर्जा व सेवा मजबुतीकरण होणे गरजेचे असल्याने ना. डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार अडीचशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी प्रदान करण्यात असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.

तालुकानिहाय कामे अशी…..
कळवण : उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट व नवीन पेडियाट्रिक आयसीयू वॉर्ड तयार करणे, ग्रामीण रुग्णालय अभोणा येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे.
सटाणा : ग्रामीण रुग्णालय सटाणा येथे पेडियाट्रिक युनिट, ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधणे, वीरगाव येथे नवीन उपकेंद्र बांधणे, ग्रामीण रुग्णालय नामपूर व डांगसौंदाणे येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे.
सिन्नर : उपजिल्हा रुग्णालय सिन्नर येथे पेडियाट्रिक युनिट बांधणे, चिंचोली येथे नवीन उपकेंद्र बांधणे, ग्रामीण रुग्णालय दोडी येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे.
सुरगाणा : ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधणे.
दिंडोरी : ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे, ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधणे तसेच निळवंडी व मातेरेवाडी येथे नवीन आरोग्य उपकेंद्र बांधणे, ग्रामीण रुग्णालय वणी येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे.
त्र्यंबकेश्वर : ग्रामीण रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट, सामुंडी व देवडोंगर येथे नवीन आरोग्य उपकेंद्र बांधणे, ग्रामीण रुग्णालय हरसूल येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे.
नांदगाव : ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट व नवीन आरोग्य उपकेंद्र बांधणे.
येवला : जळगाव (निं) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र बांधणे, ग्रामीण रुग्णालय नगरसूल सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे.
चांदवड : ग्रामीण रुग्णालय चांदवड येथे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधणे.
निफाड : ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे ग्रामीण रुग्णालय निफाड येथे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधणे.
पेठ : ग्रामीण रुग्णालय पेठ येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधणे.
इगतपुरी : ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे व ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधणे.
मालेगाव : चिंचवे येथे नवीन आरोग्य उपकेंद्र बांधणे.
नाशिक : ग्रामीण रुग्णालय गिरणारे येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम व वॉर्ड विस्तार करणे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय कळवण, मालेगाव, सिन्नर, येवला, चांदवड व ग्रामीण रुग्णालय इगतपुरी, वणी, सटाणा येथे प्रत्येकी एक नवीन पेडियाट्रिक आयसीयू वॉर्ड तयार करणे.

हेही वाचा:

Back to top button