पुणे : वर्षभरात 46 दात्यांनी केले अवयवदान | पुढारी

पुणे : वर्षभरात 46 दात्यांनी केले अवयवदान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अवयवदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीसह विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. याचाच परिणाम म्हणून गेल्या वर्षी 46 दात्यांनी अवयवदान केले. हृदय, मूत्रपिंड, यकृत, स्वादूपिंड अशा विविध अवयवांच्या दानामुळे रुग्णांना नवसंजीवनी मिळाली. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे अवयवदानाची प्रक्रिया संथ झाली होती. सन 2018-19 मध्ये पुणे विभागात 63 जणांनी अवयवदान केले. सन 2019-20 मध्ये 41 जणांनी, तर 2020-21 मध्ये 25 जणांनी अवयवदान केले होते. यावर्षी अवयवदानाचे प्रमाण 46 इतके आहे.

एखाद्या व्यक्तीला ‘ब—ेनडेड’ घोषित केल्यावर अवयवदानासाठी नातेवाइकांचे समुपदेशन केले जाते. त्याचप्रमाणे जनजागृतीसाठी सायकल रॅली, लघुपट, पोस्टर अशा विविध माध्यमांचा उपयोग होतो. पुणे विभागात गेल्या वर्षी 46 दात्यांकडून 66 मूत्रपिंड, 44 यकृत, 2 हृदय, यकृत आणि स्वादूपिंड 1, तसेच हृदय आणि फुप्फुसे 2 आदी अवयवांचे प्रत्यारोपण पार पडले. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या दिवसांमध्ये एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे अवयवदान करण्यास परवानगी दिल्याने विविध वयोगटांतील गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले. ती बालिका सर्वांत लहान वयाची अवयवदाता ठरली.

अवयवदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. कोरोना महामारीनंतर अवयवदानामध्ये वाढ होत आहे.

                                                               – आरती गोखले,
                                            पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती

Back to top button