Nashik ZP Teacher : जि. प. च्या २०४ शिक्षकांच्या बदल्या | पुढारी

Nashik ZP Teacher : जि. प. च्या २०४ शिक्षकांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या (Nashik ZP Teacher) जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रीकरणात २०४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता संवर्ग तीन अंतर्गत बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना मंगळवार (दि. १०) ते शनिवार (दि. १४)पर्यंत ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. प्रक्रिया पूर्ण झालेली असली तरी शिक्षकांना ३० एप्रिलनंतरच बदली आदेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे बदली प्रक्रिया नियमितपणे सुरू राहणार असली तरी प्रत्यक्षात शिक्षक हे नवीन वर्षांतच शाळेत रुजू होतील.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत संवर्ग एक अंतर्गत दिव्यांग, गंभीर आजार आदी शिक्षकांची बदली होते. यात ४५८ शिक्षकांची बदली झाली आहे. या शिक्षकांना १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बदलीचे आदेश प्राप्त होणार होते. परंतु, राज्य सरकारने ही मुदत वाढवून ३० एप्रिल ते ३० मे २०२३ केली आहे. उन्हाळी सुटीत एकाच वेळी शिक्षकांना बदली आदेश प्राप्त होतील. संवर्ग दोन अंतर्गत पती-पत्नी एकत्रीकरण केले जाते. सद्यस्थितीला ज्या ठिकाणी हे शिक्षक कार्यरत आहेत, त्या ठिकाणाचे अंतर हे ३० किलोमीटरपेक्षा जास्त आहे, अशा २०४ शिक्षकांची बदली झाली आहे. त्यांनी ३० डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ या कालावधी ऑप्शन फॉर्म म्हणजेच ३० शाळा निवडल्या होत्या.

आता संवर्ग तीन अंतर्गत अवघड क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे व सोप्या क्षेत्रात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा झाली असेल, अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त समजले जाते. त्यांची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. १६ ते १९ जानेवारीपर्यंत या संवर्गातील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होईल. २० जानेवारी रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button