कोल्हापूर, डॅनियल काळे : राज्यभरातील वीज मीटर रीडिंगच्या तक्रारीचे प्रमाण डिसेंबर 2022 ला लक्षणीय प्रमाणात घटले आहे. गेले वर्षभर सातत्याने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मीटर रीडिंग घेणार्या कंपन्यांवर कारवाई केल्याने आता बिनचूक रीडिंग होत आहे. परिणामी महावितरणच्या महसुलात दरमहा 250 कोटीची वाढ तर झालीच आहे. शिवाय ग्राहकांची होणारी लूटही आता थांबली आहे.
महावितरणकडून राज्यभरातील ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठ्याच्या मोबदल्यात दरमहा वीज बिलाची आकारणी महावितरणकडून केली जाते. यासाठी प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र वीज मीटर देण्यात आले आहे. दरमहा फोटो काढून मीटर रीडिंग घेतले जाते. 2020 पासून या फोटो मीटर बाबतच्या तक्रारींचे प्रमाण वाढले होतो. रीडिंग घेतानाचे अस्पष्ट फोटो येणे, मीटरऐवजी भिंतीचा फोटो येणे अशा नाना प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्याने महावितरण विरोधात राज्यभरातील वीज ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या. 2020 आणि 2021 या दोन वर्षात महावितरणकडे फोटो मीटर रीडिंगच्या 10 लाख 22 हजार इतक्या तक्रारी आल्या होत्या.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत फोटो मीटर रीडिंग घेणार्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कामात सुधारणा न केलेल्या 76 कंपन्यांना बडतर्फ केले. या कारवाईमुळे बिनचूक मीटर रीडिंगचे प्रमाण वाढले असून चुकीच्या रीडिंगच्या तक्रारीचे प्रमाण 10 लाखावरून 2 लाखापर्यंत खाली आले आहे. नव्या वर्षात या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्यामुळे फोटो मीटर रीडिंगमधला घोळ आता संपणार आहे.