बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पक्षासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि अनेक गुन्हे अंगावर घेणाऱ्यांना पाळापाचोळा म्हणणारे खासदार संजय राऊत म्हणजे शिवसेना या वटवृक्षावरील बांडगूळ असून, हे बांडगूळ आता वटवृक्ष संपवायला निघाले असल्याचा जोरदार प्रहार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांवर केला. दरम्यान, यापुढे नाशिकसाठी विकासकामे आमच्यासाठी महत्त्वाची असल्याने राऊत आमच्यासाठी अदखलपात्र असल्याची भूमिका खासदार हेमंत गोडसे आणि माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मांडली.

खासदार राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नाशिकमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच शिवसैनिकांना चोर, लफंगे, लाचार, गद्दार, चायनीज माल आणि पालापाचोळा तसेच संबंधितांचा डीएनए तपासण्याची गरज अशा शब्दांमध्ये संबोधले होते. राऊतांच्या या टीकेला सोमवारी (दि.९) शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यावेळी अजय बोरस्ते यांनी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ता काळात उत्तर महाराष्ट्राचे संपर्कनेते म्हणून राऊत यांनी नाशिक शहरासाठी कुठला प्रकल्प आणला? किती जणांना रोजगार दिले, असा प्रश्न करत ते नाशिकला केवळ पर्यटनांसाठी आणि कलेक्शन करण्यासाठीच येत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या जवळील काही व्यक्तींना त्रास झाला की, ते दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतात. 'बाळासाहेबांची शिवसेना पक्षाबरोबर आमचा घरोबा झाला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसाठी, शहर विकासासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार बोरस्तेंनी करत ते स्वत:ला प्रतिउध्दव ठाकरे समजू लागल्याचा आरोप केला.'

खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, राऊत यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा कट रचून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. या अनैसर्गिक युतीबद्दल खासदार-आमदार आणि शिवसैनिकांमध्ये खदखद निर्माण झाल्यानेच ते बाहेर पडत आहेत. राऊत उध्दव ठाकरे यांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यामुळेच पक्ष संपत चालला असून, राऊत नाशिकमध्ये येतात तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसैनिकांचा पाऊस पडतो, अशी टीकाही खा. गोडसे यांनी केली.

हेच यांचे हिंदुत्व का?
महापालिकेच्या सभागृहात वंदे मातरम‌्ला विरोध करणाऱ्या मुशीर सय्यद यांच्या हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणीवर ताव मारणे हेच राऊतांचे हिंदुत्व काय? असा सवाल शिवसैनिक योगेश बेलदार यांनी करत आम्हाला बाळासाहेबांचे हिंदुत्व शिकवण्याची राऊतांकडून अजिबात अपेक्षा नसल्याचे सांगितले. माजी महानगरप्रमुख शिवाजी पालकर यांचे चिरंजीव रुपेश पालकर यांनी शिवसेना कार्यालयाचा करारनामा माझ्या वडिलांच्या नावे असल्याने ठरवले तर शिवसेना कार्यालय ताब्यात घेऊ शकतो, असा इशारा दिला. शिवसैनिक योगेश बेलदार, रुपेश पालकर, उमेश चव्हाण, अंबादास जाधव, अमोल सूर्यवंशी, प्रमोद जाधव, संदीप डहांके यांना ओळखत नसल्याचे राऊत यांनी सांगितले होते. त्यावर संबंधितांनी त्यांच्याबरोबरचे छायाचित्र आणि कागदोपत्री पुरावे सादर करत आमच्या जाण्याने राऊत हादरल्याचा दावा केला.

राऊतांचा डीएनए तपासण्याची गरज
संजय राऊत शिवसेनेच्या वटवृक्षावरील बांडगूळ असून, ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पाळापाचोळा समजणाऱ्या राऊतांचाच डीएनए तपासण्याची वेळ आल्याचा टोला अजय बोरस्ते यांनी लगावला. आम्ही या शहरातील खानदानी लाेक आहोत. आमचा सूड घेण्याऐवजी लोकच तुमचा सूड घेतील, असा इशारा बोरस्तेंनी दिला.

.. तर डिपॉझिट जप्त झाले असते
खासदार राऊत हे केवळ एका मताने राज्यसभेवर निवडणूक गेले आहेत. आमदारांच्या मतांवर निवडून आलेल्या आमदारांनाच ते गद्दार समजतात. मात्र, त्याच आमदारांनी त्यांना मतदान केले नसते तर त्यांचेच डिपॉझिट जप्त झाले असते. त्यामुळे राऊतांनी आम्हाला आव्हान न देता स्वत:चा विचार करावा, असा सल्ला खा. गोडसे यांनी दिला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news