

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शास्त्रीय नृत्याविष्कारांचा बहारदार नजराणा…, सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील कलाकारांसोबत रंगतदार गप्पांची मैफील…, कस्तुरींसोबत गंमतीशीर खेळ अशा जल्लोषी वातावरणात सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षांच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा होणार आहे. निमित्त आहे दै.'पुढारी' कस्तुरी क्लब आयोजित जल्लोष 2023 या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नूतन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतील कलाकार आपल्या भेटीला येत आहेत.
राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ येथे सोमवारी (दि 9) दुपारी 2.30 वाजता होणार्या कार्यक्रमात 'जीवाची होतीया काहिली' या मालिकेतील प्रमुख जोडी राज हंचनाळे (अर्जुन), प्रतीक्षा शिवणकर (रेवती) आणि 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेतील मयुरी वाघ (एकवीरा देवी ) तसेच नव्याने सुरू होणार्या 'प्रतिशोध' या मालिकेतील अमोल बावडेकर (ममता) आणि पायल मेमाणे(दिशा) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नववर्षांच्या प्रारंभीच भरतनाट्यम, कथ्थक, घुमर, नृत्य अभिनय असे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्याविष्कार कार्यक्रमांची रंगत असणार आहेत. भरतनाट्यम हा नृत्यप्रकार डॉ. बिंदू राव यांच्या नृत्यनिकेतन संस्थेचे कलाकार तर कथ्थक नृत्यकलेचे सादरीकरण मंजिरी फडणीस यांच्या श्री नटराज अकादमीचे विद्यार्थी करणार आहेत. यासोबतच मजेशीर खेळ खेळत त्यामधून कस्तुरी क्लब सभासदांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
अनुजा जगधने : 8605095112
दीपा कुलकर्णी : 8805007724