नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट? | पुढारी

नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट?

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभागाच्या नावाच्या बनावट पावत्यांच्या आधारे १०० रुपये प्रवेशशुल्क आकारून सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची लूट केली जात आहे, अशी तक्रार ॲड. विनायक पगार यांनी वनविभागाकडे केली आहे.

येथील शिवप्रेमी पाच दिवसांपूर्वी साल्हेर किल्ला पाहण्यास गेले असता, ताहाराबाद वन परिक्षेत्रांतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत प्रतिव्यक्ती १०० रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यांना दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शुल्क पावत्या देण्यात आल्या. पावत्यांवर शिक्का नव्हता. तसेच किल्यावर जाण्याकरिता दिशादर्शक फलक, पारंपरिक मार्ग, प्राचीन मार्ग फलक असे काहीही नव्हते. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची तसेच गुहांची स्वच्छताही करण्यात आलेली नव्हती. परंतु, संयुक्त वन व्यवस्थापन समितींतर्गत कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसताना संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाच्या नावाचा गैरवापर करून गडप्रेमी पर्यटकांना लुटले जात आहे, अशी तक्रार ॲड. पगार यांनी केली आहे. शासकीय परिपत्रकाचा दुरुपयोग करून खोट्या सरकारी दस्त पावत्यांप्रकरणी वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करीत दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ॲड. पगार यांनी केली आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणी भोये यांच्याकडे व वनकर्मचारी संदीप गायकवाड यांच्या खोट्या पावत्या दाखवून तक्रार केलेली आहे. या प्रकरणी आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार आहोत.

-ॲड. विनायक पगार, कळवण

हेही वाचा :

Back to top button