पिंपरी : क्लिनिकमध्ये तोडफोड करून खंडणीची मागणी | पुढारी

पिंपरी : क्लिनिकमध्ये तोडफोड करून खंडणीची मागणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मी यापूर्वी हाफ मर्डर केला आहे. माझ्यावर 326 पण दाखल आहे, तुला माहिती नाही का? मला आत्ताच्या आत्ता 10 हजार रुपये दे, अशी धमकी देत एका गुंडाने दिघी रोडवरील पवार क्लिनिकमध्ये तोडफोड केली. तसेच, डॉक्टरांना मारण्यासाठी धावून गेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 3) रात्री घडला. डॉ. रामदास शिवराम पवार (53, रा. मोशी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोपान निवृत्ती गवळी ( 35, रा. भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी डॉ. पवार यांचे दिघी रोडवर क्लिनिक आहे. दरम्यान, ते मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या क्लिनिकमध्ये असताना आरोपी गवळी क्लिनिकमध्ये आला.

क्लिनिकमधील रुग्णांना शिवीगाळ, दमदाटी करून दहशत माजवत डॉ. पवार यांना शिवीगाळ करून मला आत्ताच्या आत्ता दहा हजार रुपये दे, नाहीतर तुझे काही खरे नाही, अशी धमकी दिली. डॉ. पवार यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने क्लिनिकमधील सीझर घेऊन डॉ. पवार यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. मी यापूर्वी हाफ मर्डर केला आहे. माझ्यावर 326 पण दाखल आहे. तुला माहिती नाही का, अशी जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button