नाशिक : सिटीलिंकचा प्रवास महागणार ; भाडेवाढीला प्राधिकरणाचा हिरवा कंदील | पुढारी

नाशिक : सिटीलिंकचा प्रवास महागणार ; भाडेवाढीला प्राधिकरणाचा हिरवा कंदील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिटीलिंक बस प्रवासी भाडेदरात सात टक्के वाढीच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे सिटीलिंकच्या प्रवासी भाडेवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा प्रस्ताव मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासमोर अंमलबजावणीसाठी सादर केला जाणार आहे.

सिटीलिंक बससेवेच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के प्रवासी भाडेवाढ अनुज्ञेय आहे. जानेवारी २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यात पाच टक्के प्रवासी भाडे दरवाढ करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सिटीलिंकच्या तोट्यात वाढ झाली आहे. त्यामुळे काहीसा तोटा भरून काढण्यासाठी यंदा पाच टक्क्यांऐवजी सात टक्के भाडेवाढीचा निर्णय सिटीलिंकने घेतला आहे. या प्रस्तावाला आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या महिन्यात मंजुरी घेतली होती. भाडेवाढ प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय लागू करता येत नसल्यामुळे सिटीलिंकने प्रस्ताव प्राधिकरणाला सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस आयुक्तांनी भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button