नाशिक : महापालिकेची ७०६ पदांची नोकरभरती आचारसंहितेच्या कात्रीत | पुढारी

नाशिक : महापालिकेची ७०६ पदांची नोकरभरती आचारसंहितेच्या कात्रीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या विविध विभागांतील ७०६ पदांची नोकरभरती प्रक्रिया नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. नोकरभरतीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात, आयबीपीएस बरोबर होणारा सामंजस्य करार आचारसंहितेत सापडल्याने मनपाची नोकरभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण ७,२०० इतकी पदे आहेत. परंतु, गेल्या १३ ते १५ वर्षांत महापालिकेत भरतीच झाली नाही. त्यात सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदांची संख्या वाढत गेल्याने कमी मनुष्यबळात सध्या मनपाचा कारभार सुरू आहे. रिक्तपदांची संख्या २,८०० वर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना मनपा प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य-वैद्यकीय व अग्निशमन या अत्यावश्यक सेवेशी संबंधित विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, सेवाप्रवेश नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकरभरतीची प्रक्रिया रखडली. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठी सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्य शासनाने नोकरभरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती करत त्यांच्यामार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याची सूचना मनपाला केली होती. त्यानुसार मनपाने संबंधित दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएसकडून महापालिकेला प्रस्ताव प्राप्त झाला असून, या संस्थेबरोबर करार करण्यात येणार होता. मात्र पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने करार करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

मनपातील मंजूर रिक्तपदांच्या भरतीसाठी आयबीपीएस संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक व त्याची आचारसंहिता लागू झाल्याने करार करण्याची प्रक्रिया काही काळ लांबवणीवर पडणार आहे. आचारसंहितेमुळे करार करता येणार नाही.

– मनोज घोडे-पाटील, उपआयुक्त (प्रशासन)

हेही वाचा :

Back to top button