

नगर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान इमरजन्सी रिस्पॉन्स कोविड पॅकेजच्या माध्यामातून 19 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे पूर्वीच्या आयसीयू बेडमध्ये आता 100 बेडची भर पडली आहे. या नवीन शंभरपैकी 40 आयसीयू बेड लहान मुलांसाठी तर उर्वरित बेड व्यक्तींसाठी असणार आहेत. याशिवाय नवीन 100 व्हेन्टिलेटर व 100 मॉनिटर देखील बसविण्यात आले असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. आगामी काळात जिल्ह्यात कोरोनाची कितीही मोठी लाट आली तरी तिला सामोरे जाण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दीड वर्षांपूर्वी कोरोनाची तिसरी लाट सुरु असतानाच जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभाग जळून खाक झाला होता. त्यामुळे नव्याने अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला. याशिवाय कोरोनाचे थैमान थांबत नाही तोच पुन्हा कोरोनाची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला.
त्यामळे केंद्र सरकारच्या वतीने कोरोना उपाययोजना करण्यासाठी 19 कोटींचा निधी उपलब्ध झाला. या निधीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात नवीन शंभर आयसीयू बेड तयार करण्यात आले. यामध्ये शंभर व्हेंटिलेटर, शंभर मॉनिटर बसविण्यात आले. खासदार डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी संयुक्तपणे सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील या नूतनीकरणाची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील घोगरे, माजी नगरसेवक धनंजय जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या पाहणीनंतर खासदार डॉ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाव्य कोरोना लाट विचारात घेता केंद्र सरकारच्या मदतीतून जिल्हा रुग्णालयाचे नूतनीकरण केले आहे. जिल्हा रुग्णालयाला लागलेली आग ही नैसर्गिक होती. यामुळे काही अधिकारी व इतर निलंबित झाले. काहींवर गुन्हे दाखल झाले. मात्र, शॉर्ट सर्किटमुळेच काही रुग्णांना जीव गमवावा लागला. अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी येथील यंत्रणेने काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार विखे पाटील यांनी केले.
कोविड सेंटर्सची गरज नाही : आमदार जगताप
कोरोना प्रादुर्भावाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाला आग लागली. त्यानंतर आयसीयू बेडची संख्या वाढविण्यात आली. काही आपदकालीन घटना घडली तरी त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा आता सज्ज झाली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. आता कोरोना संसर्गामुळे कोणतीही जीवितहानीची घटना घडणार नाही. त्यामुळे कोविड सेंटर्सची गरज भासणार नाही, असा विश्वास देखील आमदार जगताप यांनी व्यक्त केला.