नगर नामांतरावर मतमतांतरे; नामांतरासह विभाजनालाही विरोध

नगर नामांतरावर मतमतांतरे; नामांतरासह विभाजनालाही विरोध
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : शासनाने महापालिकेला पत्र देऊन नगर शहराच्या नामांतराबाबत महासभेचा ठराव घ्या, असे सूचविले आहे. त्या पार्श्वभूमीवर दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नामांतर आणि जिल्हा विभाजनला तीव्र विरोध दर्शविला आहे. तर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरापेक्षा जिल्हा विभाजन महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. त्यामुळे नामांतर व जिल्हा विभाजनावर मतमतांतरे सुरू झाली आहेत.

खासदार असेपर्यंत विभाजन होवू देणार नाही : विखे
नगर शहराचे नाव बदलण्याचा संपूर्ण अधिकार नगरकरांना आहे. बाहेरच्या माणसाने सांगणे योग्य नाही, असे सांगत स्वपक्षातील आमदार गोपीचंद पडळकरांच्या मागणीला घराचा आहेर दिला. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाला माझा वैयक्तिक विरोध आहे. जिल्हा विभाजन करून जिल्ह्याची ताकद कमी होणार आहे. जोपर्यंत मी खासदार आहे तोपर्यंत जिल्ह्याचे विभाजन होऊ देणार नाही, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. सुजय विखे आज नगरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. विखे म्हणाले, नगरच्या नामांतरचा विषय हा स्थानिक नागरिकांचा आहे. महापालिकेमध्ये सर्व पक्षाचे नगरसेवक आहे. तेथे जनरल बोर्डामध्ये याबाबत विषय होणार आहे. प्रत्येकाचे मत मतांतर आहे, कोणाचे नाव दिल्याने जिल्ह्याचा लगेच कायापालट होणार, असे काही नाही. नाव देण्याचा विषय या बाहेरच्या व्यक्तीने उपस्थित केला आहे. नगरचे नाव बदलायचे की नाही हा स्थानिक पातळीवरचा विषय आहे, जनतेचा विषय आहे. जनता ज्या बाजूने जाईल त्या बाजूने मी राहील, असेही खासदार विखे म्हणाले. दुसरीकडे जिल्हा विभाजनाचा विषय पुढे येत आहे. तर, जिल्हा विभाजनाला माझा विरोध आहे आणि राहील, असेही ते म्हणाले.

नामांतराअगोदर जिल्हा विभाजन करा : जगताप

जिल्ह्याचे नामांतर करण्याअगोदर जिल्ह्याचे विभाजन करावे. जेणेकरून दक्षिण जिल्ह्याचा विकास होईल, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत अहमदनगर शहराचे नामांतर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे, असा तारांकित प्रश्न मांडला. यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून महापालिकेला महासभेत ठराव घेऊन पूर्तता करावी, अशा सूचना आल्या आहेत.

त्याबाबत पत्रकारांनी आमदार संग्राम जगताप यांना विचारणा केली असता ते म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराबाबत शासनाकडून पत्र आल्याचे आज समजले. मात्र, जिल्ह्याच्या नामांतराला आमचा विरोध नाही. याबाबत लोकांची मतमतांतरे आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे, की अंबिकानगर करा, काहीचे म्हणणे आनंदनगर करा, अशी मते आहेत. त्यामुळे नामांतराला आमचा विरोध नाही. त्या अगोदर आपण सर्वांनी पुढाकार घेऊन जिल्ह्याचे विभाजन करावे. जिल्हा विभाजनाची फार पूर्वीची मागणी आहे. यापूर्वी अनेकांनी जिल्हा विभाजनाची मागणी केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news