नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवी दिशा, नवी आशा व नवी आकांक्षा घेऊन आलेल्या २०२३ मधील पहिल्या सूर्योदयाच्या साक्षीने नाशिककरांनी सहकुटुंब देवदर्शन घेत नूतन वर्षाचा प्रारंभ केला. शहर-परिसरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच रांगा पाहायला मिळाल्या.
सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर शहरवासीयांनी रविवारी (दि. १) पहाटे उत्साहात देवदर्शनाला पसंती दिली. नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता मंदिर, शहरवासीयांचे श्रद्धास्थान असलेले रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती तसेच गंगापूर रोडवरील नवश्या गणपती याबरोबरच विशेष धार्मिक महत्त्व असलेले पंचवटीमधील श्री काळाराम, भगवान कपालेश्वर, सांडव्यावरची देवी मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना भाविकांनी मनोभावे केली. यावेळी भाविकांनी केलेल्या भगवंताच्या नाम जयघोषाने अवघा मंदिर परिसर दणाणून गेला.
जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, चांदवडची रेणुकामाता, इगतपुरीची घाटनदेवी, भगूरची रेणुका, नस्तनपूरचे शनिमहाराज यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळी नागरिक नतमस्तक झाले. भाविकांच्या गर्दीमुळे या मंदिर-परिसरांना जत्रेचे स्वरूप आले होते. दरम्यान, दिवसभर मंदिरांमध्ये वर्दळ पाहायला मिळाली.
सहकुटुंब मिसळीचा आस्वाद
नाशिककरांनी देवदर्शनानंतर सहकुटुंब तसेच मित्रमंडळींसोबत झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतला. शहरातील तसेच शहरालगतच्या गावांमधील मिसळीसाठीची हॉटेल्स् सकाळपासूनच हाउसफुल्ल हाेती. यावेळी खव्वयांमध्ये मिसळ-पावावर ताव मारतानाच गप्पागोष्टींचा फड रंगल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले.