सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : दिंडोरीतील 10 गावांत होणार भूसंपादन | पुढारी

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : दिंडोरीतील 10 गावांत होणार भूसंपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहुप्रतीक्षित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी दिंडोरीतील दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जमीन भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तालुक्यातील १० गावांमधील ५३ गटांसाठी ही अधिसूचना आहे.

केंद्र सरकाच्या भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई हा एक हजार २७० किलोमीटरचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. महामार्गामुळे नाशिक-सुरत अंतर अवघ्या १७६ किलोमीटरवर येणार असून, प्रवासाचा कालावधीही पावणेदोन तासांवर होणार आहे. प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या सहा तालुक्यांतील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरगाणा व पेठ वगळता अन्य तालुक्यांतील जमिनींबाबतची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध केली.

दिंडोरी महामार्गासाठी आवश्यक अतिरिक्त जमीनीसाठीची अधिसूचना शुक्रवारी (दि. ३०) घोषित करण्यात आलीे. तालुक्यातील १० गावांमधील १४.२७४७ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या कालावधीमध्ये आक्षेप घेण्याची मुदत असून, त्याबाबत दिंडोरीचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे.

प्रस्ताव केंद्रस्तरावर

जिल्ह्यात सहा तालुक्यांतून ग्रीनफिल्ड महामार्ग जाणार आहे. जिल्ह्यात सहा तालुक्यांत ३ पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन पॅकेजचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यामध्ये नाशिक व सिन्नर तसेच निफाड आणि दिंडोरी या दोन पॅकेजचा समावेश आहे. जून २०२३ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांतील भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने डाेळ्यासमोर ठेवले आहे.

भूसंपादन कंसात गटसंख्या

आंबेगण (५), ढकांबे (८), थाउर (४), इंदोरे (१), नाळेगाव (४), पिंपळनारे (७), रासेगाव (१३), शिवनई (१), उमराळे बु. (१०), वरंवडी (१).

– जिल्ह्यातून १२२ किलोमीटरचा मार्ग

– ९९५ हेक्टर जमीन होणार संपादित

– जिल्ह्यात प्रकल्पासाठी १५ हजार कोटींचा खर्च

– ३ पॅकेजमध्ये काम; २०२६ पर्यंत प्रकल्पाचे काम

हेही वाचा :

Back to top button