Small Savings Schemes | मोदी सरकारची नवीन वर्षाची भेट! अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ | पुढारी

Small Savings Schemes | मोदी सरकारची नवीन वर्षाची भेट! अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने अल्पबचत ठेव योजनांवरील (Small Savings Schemes) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस मुदत ठेव, एनएससी (नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेट) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेत व्याजदर मजबूत करण्यासाठी या ठेव योजनांच्या व्याजदरात १ जानेवारीपासून १.१ टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पण, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि बालिका बचत योजना सुकन्या समृद्धीवरील व्याजदरात बदल करण्यात आलेला नाही. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर १ जानेवारीपासून सात टक्के व्याज मिळणार आहे. सध्या हा व्याजदर ७.८ टक्के आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्याच्या ७.६ टक्क्यांऐवजी ८ टक्के व्याज मिळणार आहे.

टर्म डिपॉझिट योजनांच्या व्याजदरात १.१ टक्क्यांपर्यंत वाढ

१ जानेवारी २०२३ पासून एक ते पाच वर्ष कालावधीच्या पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट योजनांवरील व्याजदरात १.१ टक्क्यापर्यंत वाढ होईल. मासिक उत्पन्न योजनेच्या व्याजदरातही ६.७ टक्क्यांवरून ७.१ टक्के वाढ करण्यात आला आहे. अल्पबचत ठेव बचत योजनांच्या व्याजदरात झालेली वाढ ही मोदी सरकारची नवीन वर्षाची भेट म्हणून पाहिली जात आहे. सध्या ही वाढ जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी करण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवरील व्याजदरातही वाढ

सरकारने पोस्ट ऑफिस एक वर्षाच्या बचत योजनांवरील व्याजदर ६.६ टक्के केला आहे. तो याआधी ५.५ टक्के होता. तर २ वर्षांच्या योजनेवर ६.८ टक्के दराने व्याज मिळेल, जो आधी ५.७ टक्के होता. ३ वर्षीय योजनेवरील व्याजदर आधीच्या ५.८ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. त्याचवेळी पंचवार्षिक योजनेवर ७ टक्के दराने व्याज मिळेल, आधी हा व्याजदर ६.७ टक्के होता. केंद्र सरकार अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा तिमाही आधारावर आढावा घेते. अल्पबचत योजनांसाठी व्याजदराचा फॉर्म्युला श्यामला गोपीनाथ समितीने दिला होता. (Small Savings Schemes)

हे ही वाचा :

 

Back to top button