नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक – पुणे महामार्गा जवळील शिंदे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील अतिक्रमण सद्या चर्चेत आहे. शाळेची संरक्षण भिंत पाडून व्यावसायिक गाळ्यांचे अतिक्रमण करण्यात आल्याचे बोलले जाते आहे.
शिंदे गावात जिल्हा परिषद शाळा आहे. तसेच शाळेला संरक्षण भिंत आहे. यातील काही भागाची भिंत पाडण्यात आली. भिंत पडलेल्या जागेवर व्यावसायीक गाळ्यांचे संकुल उभारण्यात आले आहे. शिंदे ग्रामपंचायतीने या गाळ्याची प्रत्येकी गाळा दिड लाखांची विक्री केली आहे. शिंदे ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभाराची सद्या पंचक्रोशीत चर्चा केली जात असून ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद विभागाची लेखी परवानगी घेऊन गाळे बांधले आहेत की नाही, तसेच जिल्हा परिषदेने परवानगी दिली असेल तर मुलांच्या खेळाच्या मैदानाची जागेला परवानगी देताना मुलांच्या हिताकडे लक्ष दिले नाही का? , त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने परवानगी दिलेली नसेल तर शिंदे ग्रामपंचायतीने विना परवानगी गाळे बांधून लिलाव केला का?, तसा अधिकार ग्रामपंचायतीला आहे का ? असे नाना अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
व्यायाम शाळेच्या बांधकामाला विरोध…
शिंदे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यावसायिक गाळ्याच्या जागेवर पूर्वी व्यायामशाळेच्या बांधकामाचे नियोजन होते. परंतु त्यावेळी एस. आर. जाधव यांनी जिल्हा परिषदेकडे लेखी अर्ज करून विरोध दर्शविल्याने व्यायामशाळेचे बांधकाम होऊ शकले नाही. असे असताना व्यावसायिक गाळ्यांना परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने दिली. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तर लोकप्रतिनिधींचे पद धोक्यात…
ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण निर्मूलन तसेच हटाव समर्थनासाठी भूमिका घेणे आवश्यक आहे. अतिक्रमण समर्थनाच्या बाजूने भूमिका घेतली तर किंवा तसे कायदेशीररित्या सिद्ध झाले तर संबधित लोकप्रतिनिधींनीचे पद देखील धोक्यात येऊ शकते.
व्यावसायिक गाळ्यांची जागा भाजीबाजाराची आहे. जिल्हा परिषदेची नाही, त्यामुळे परवानगीचा विषयच येत नाही. शाळेची भिंत जीर्ण झाल्यामुळे ती पाडण्यात आली. गाळ्याच्या बांधकामासाठी पाडलेली नाही. – गोरख जाधव, सरपंच शिंदेगाव.