

पिंपरी : शहरामध्ये घरगुती कचर्याचे 85 ते 90 टक्के विलगीकरण होत आहे. औद्योगिक कंपन्यांनी त्यांच्या आवारात निर्माण होणार्या अघातक कचर्याचे ओला व सुका असे विलगीकरण करून दिल्यास तो कचरा महापालिकेच्या वतीने संकलित करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) कचर्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील सर्व कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे. शहरातील औद्योगिक कचर्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, लघुउद्योजक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक झाली. बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते.
या वेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे दीपक करंदीकर, लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे, विनोद नाणेकर, जयंत कड, अभय भोर, सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते व प्रतिनिधी उपस्थित होते.
कचरा विलगीकरण न केल्यामुळे पर्यावरणावर त्याचा घातक परिणाम होतो. परिणामी, त्याचा मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. औद्योगिक कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. त्यासाठी प्रतिसाद देण्याचे आश्वासन प्रतिनिधींनी दिले.
– अजय चारठाणकर, उपायुक्तऔद्योगिक कंपन्यांनी त्यांच्या आवारात निर्माण होणार्या अघातक कचर्याचे योग्य विलगीकरण करून ठेवल्यास तो कचरा पालिका संकलित करेल. कंपन्यांनी एकत्रित येऊन योग्य समन्वय साधून घातक कचर्याचे एकत्रित संकलन केल्यास दळणवळणासाठी ते सोयीचे ठरेल. एमआयडीसी भागातच कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
– जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त