नाशिक : ‘एसएमबीटी’त यशस्वी सांधेरोपण; हुबेहूब चित्र रेखाटून डॉक्टरांना ‘सरप्राइज’ भेट | पुढारी

नाशिक : ‘एसएमबीटी’त यशस्वी सांधेरोपण; हुबेहूब चित्र रेखाटून डॉक्टरांना ‘सरप्राइज’ भेट

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
कुटुंबाची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले. अनेक दवाखान्यांचे उंबरठ झिजवले मात्र कुठे खर्च परवडेनासा तर कुठे निदान होत नव्हते. अखेर कंटाळून पुन्हा ते घरी परतले. यानंतर एसएमबीटी रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाचे दोन्हीही पायांच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण करण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णाला आता हालचाल करणे शक्य झाले असून नेहमीप्रमाणे चालू शकत आहे. या रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांचे रेखाटलेले हुबेहूब छायाचित्र भेट देऊन या रुग्णाने अनोखे आभारप्रदर्शन केले. त्याने डॉक्टरही भारावून गेले.

घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मूळ रहिवासी असलेले संदीप मुरलीधर बोधडे यांची. बोधडे सध्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील  मनमाड येथे वास्तव्यास आहेत. ते टॅटू आर्टिस्ट व कलाकार आहेत. मित्राने दिलेल्या माहितीवरून त्यांनी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. सांधेरोपण व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मनोज काशिद यांनी तत्काळ या रुग्णाला दाखल करून घेतले. थोड्याच दिवसांत त्यांचा खुबा सांधेरोपण करण्यात आले. महिनाभारत दुसर्‍याही खुब्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. विशेष म्हणजे, सर्वकाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत झाल्यामुळे त्यांना आर्थिक भार सोसावा लागला नाही. दरम्यान, बोधडे यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार करणार्‍या डॉ. काशिद यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानण्याचे ठरवले. त्यांनी सोशल मीडियात त्यांचे फोटो शोधले. फेसबुकवरून फोटो शोधून रेखाटला. शस्त्रक्रियेनंतर चार-पाच दिवसांनी डॉ. काशिद या रुग्णाला भेटण्यास आले, तेव्हा बोधडे यांनी एका कागदावर डॉ. काशिद यांचे पेन्सिलीच्या सहाय्याने रेखाटलेले चित्र त्यांना भेट दिले. हे चित्र हुबेहूब डॉ. काशिद यांचेच असल्याचे पाहून उपस्थित डॉक्टरांसह सर्वांनाच कौतुक वाटले. आपण कधी चालू शकू की नाही असा प्रश्न काही दिवसांपूर्वी पडलेल्या बोधडे यांना चालता येऊ लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर बोधडे यांनी येथील अनेक डॉक्टरांचे चित्र रेखाटून दिले.

या रुग्णाचे वय कमी असल्याने मला त्याला चालताना बघायचे होते. आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने दोन्ही ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. या रुग्णाने माझे व पत्नीचे जे हुबेहूब चित्र रेखाटले यामुळे मी भारावलो. रुग्णांच्या प्रति डॉक्टरांचे असलेले कष्ट, आणि डॉक्टरांच्या प्रति रुग्णांचे असलेले प्रेम यातून दिसते. -डॉ. मनोज काशिद, सांधेरोपण व अस्थिरोग तज्ज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल.

हेही वाचा:

Back to top button